• Sat. Sep 21st, 2024

करन्सी नोट प्रेसमधून नोटा गहाळ झाल्याची अफवाच; प्रेस मजदूर संघाच्या सरचिटणीसांचा खुलासा

करन्सी नोट प्रेसमधून नोटा गहाळ झाल्याची अफवाच; प्रेस मजदूर संघाच्या सरचिटणीसांचा खुलासा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : येथील करन्सी नोट प्रेसमधून एकही नोट गहाळ झालेली नाही, असा खुलासा प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.या नोटा प्रेसकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रिझर्व्ह बॅँकेच्या ताब्यात देण्यात आल्या असून, तसे कागदोपत्री पुरावेही आहेत. प्रेसकडून ३१ मार्चनंतर रिझर्व्ह बॅँकेकडे पोहोचलेल्या नोटा पुढील आर्थिक वर्षात हिशेबात दाखवायला हव्यात, असेही ते म्हणाले. भारतात नोटांची छपाई प्रेस महामंडळाच्या नाशिकरोड, मध्य प्रदेशातील देवास येथे होते. अलीकडे रिझर्व्ह बॅँकेने म्हैसूर (कर्नाटक) आणि सालबोनी (पश्चिम बंगाल) येथे स्वतःच्या प्रेस सुरू केल्या आहेत. देशाच्या ६० टक्के नोटा रिझर्व्ह बॅँक, तर ४० टक्के नोटा नाशिक व देवास प्रेस छापतात. नाशिकरोड प्रेसला यावर्षी भारताच्या ५,२५० दशलक्ष, तर नेपाळच्या ८५० दशलक्ष नोटा छापण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नाशिकरोड प्रेसमध्ये एक रुपयापासून पाचशेपर्यंतच्या नोटा छापल्या जातात. सध्या २०, ५० आणि ५०० च्या नोटांची छपाई सुरू आहे. प्रेसमध्ये छापलेल्या नोटा जमा करण्यासाठी देशाचे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे भाग करण्यात आले आहेत. नाशिकच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेच्या बेलापूर आणि अहमदाबाद ‘चेस्ट’मध्ये (लॉकर) ३१ मार्चपर्यंत जमा केल्या जातात. देशातील चार प्रेसकडून छापून आलेल्या नोटा रिझर्व्ह बँक मागणीनुसार राष्ट्रीयीकृत व इतर बॅँकांना वितरित करते. या सर्वांच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यामुळे नोटा गहाळ होऊ शकत नाहीत, असेही त्यांनी अधोरेखित केले.

…असा झाला गैरसमज

गोडसे यांनी सांगितले, की नाशिकरोड, देवास, म्हैसूरच्या प्रेसमधून पाचशे रुपयांच्या हजारो नोटा ज्यांचे मूल्य ८८ हजार ३२ कोटी रुपये आहे, या २०१५-१६ या आर्थिक वर्षात गहाळ झाल्याचे वृत्त खात्री न करताच प्रसारित झाले. अब्जावधी नोटा छापताना प्रेसमधून एक जरी नोट गहाळ झाली, तरी सखोल चौकशी होते. सर्व प्रेसने छापलेल्या नोटा आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बॅँकेच्या ‘चेस्ट’कडे जमा करायच्या असतात. नाशिकरोड प्रेसला रेल्वेनेच नोटा पाठविण्याची परवानगी आहे. काही वेळा तांत्रिक कारणामुळे रेल्वेला विलंब होतो. त्यामुळे नाशिकरोडला छापलेल्या नोटा रेल्वेने ३१ मार्च संपल्यानंतर १ किंवा २ एप्रिलला पोहोचल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे या नोटा त्या वर्षाच्या अकाऊंटमध्ये दाखविण्याएवजी पुढील आर्थिक वर्षाच्या हिशेबात दाखविल्या आहेत. आता असा विलंबच होऊ नये म्हणून रिझर्व्ह बॅँकेने १५ मार्च ही नोटा पोहोच करण्याची अंतिम मुदत केली आहे. या तीनही प्रेसकडून ३१ मार्चनंतर पोहोचलेल्या नोटांचा विचार न करता केवळ रिझर्व्ह बॅँकेकडे ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बॅँकेत जमा झालेल्या नोटांचाच विचार करून बॅँकेच्या वेबसाइटच्या हवाल्याने चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले. नाशिकरोड प्रेसमधून नोटा बाहेर पडल्याचे, रिझर्व्ह बॅँकेच्या ताब्यात दिल्याचे ‘अप टू डेट रेकॉर्ड’ आहे. या वृत्तानंतर रिझर्व्ह बॅँकेने सर्व प्रेसकडून नोटांचा अहवाल मागविला आहे. त्यानंतर बॅँक या प्रकरणावर अधिक प्रकाश टाकेल, असेही गोडसे म्हणाले.
निवडणूक अधिकाऱ्यावर नोटा उधळणाऱ्या संशयितांना जामीन; अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचा निर्णय
नोटा रिझर्व्ह बॅँकेच्या ताब्यात दिल्याच्या काटेकोर नोंदी प्रेसकडे आहेत. करोना काळात शंभरावर प्रेस कामगारांचे प्राण गेले. पण, छपाई थांबली नाही. त्यामुळे प्रेसच्या प्रामाणिकतेवर कोणीही शंका घेऊ नये.-जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed