यावेळी प्रसारमाध्यमांनी गेल्या काही दिवसांमध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाचा मुद्दा उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या भेटीविषयी प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, औरंगजेबावरुन वाद निर्माण करणाऱ्यांनी प्रथम स्वत:चचे चारित्र्य बघावे. तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात कामाला होतात की नाही, तिकडे नोकऱ्या करायचात की नाही, हे सांगावे. आम्ही तर दरबारात साधे चोपदारही नव्हतो. त्यामुळे लोकांना शहाणपण शिकवताना प्रथम आपला इतिहास तपासावा, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना फटकारले.
जुन्या काळात जयचंद होते, त्यांनी परकीयांना राज्यात आणलं, त्यामुळे आपण गुलाम झालो. त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी प्रथम ते जयचंद आहेत की नाही, याचा खुलासा करावा आणि मग आमच्यावर टीका करावी, असेही प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले. यावर आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावे लागेल.
औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकर म्हणाले…
राज्यात १२ ठिकाणी दंगली करण्याचा प्रयत्न झाला. नागपूर एसआयटीचा रिपोर्ट वाचला तर त्यामध्ये सरकारला सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. काही संघटना राज्यात दंगल करणार आहेत, असे त्या अहवालात म्हटले होते. पण महाराष्ट्राच्या जनतेने दंगलींना प्रतिसाद दिला नाही. सर्व दंगली दोन ते तीन तासांमध्ये आटोक्यात आल्या. याचा अर्थ महाराष्ट्रातील जनतेचा या दंगलींना पाठिंबा नाही, असे प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले.
तसेच तुम्ही औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने तुमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची राजकीय अडचण होत असल्याचा मुद्दा यावेळी प्रसारमाध्यमांनी उपस्थित केला. हा पेचात पकडणारा प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी शिताफीने परतवून लावला. औरंगजेबाच्या कबरीला मी भेट दिल्यानंतर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने अद्याप कोणतंही वक्तव्य केलेले नाही. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्त्व हे प्रबोधनकारांचे हिंदुत्त्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्त्वही प्रबोधनकारांचे हिंदुत्त्व होते. नंतर सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी जे जे करता येईल, ते ते केले. पण शिवसेनेच्या हिंदुत्वाचा मूळ गाभा हा प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचाच राहिला. आता उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही त्याच मार्गावर चालत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.