एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच हेलिकॉप्टरने पालघरमध्ये उतरले. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस वेगवेगळ्या गाड्यांना कार्यक्रमस्थळी रवाना झाले. यावेळी शिंदे यांनी फडणवीसांना आपल्याच गाडीतून येण्याची विनंती केली. परंतु, फडणवीसांनी’ तुम्ही चला’ असे सांगत नम्रपणे ही ऑफर नाकारल्याचे सांगितले जाते. त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही हे दोन्ही नेते सुरुवातीला एकमेकांशी फारसे बोलताना दिसत नव्हते. जाहिरातीच्या वादानंतर दोघांमध्ये काहीसा ऑकवर्डनेस आल्याचे जाणवत होते. काही मोघम वाक्य सोडता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फारसा संवाद झाला नाही. एकूणच या दोन्ही नेत्यांमधील नेहमीची केमिस्ट्री दिसत नसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. त्यामुळे शिवसेनेच्या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस भलतेच नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात या सगळ्या शंका-कुशंका निकालात काढल्या. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात आमच्या कोणतेही वितुष्ट नसल्याचे सांगत या वादावर पडदा टाकला.
कुणीही आमची चिंता करु नये, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
शिवसेनेच्या जाहिरातीमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून परस्परांना इशारे-प्रतिइशारे देण्यात आली होती. या सगळ्यात देवेंद्र फडणवीस हे मात्र मौन बाळगून होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आज काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी म्हटले की, एकनाथ शिंदेंसोबतचा प्रवास तो कालही सोबत होता, तो आजही सोबत आहे आणि तो उद्याही सोबतच राहणार आहे, कारण- आम्ही सरकार बनवलं खुर्च्या तोडण्याकरता नाही, पद मिळवण्याकरता नाही, हे सरकार लोकांच्या जीवनात सामाजिक-आर्थिक परिवर्तन करण्यासाठी आलं आहे. एखाद्या जाहिरातीमुळे, एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्य़े काही होईल, एवढं तकलादू हे सरकार नाही. हे जुनं सरकार नाही, कुणी आधी भाषण करायचं आणि कुणी नंतर करायचं? याच्यासाठी एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही बघितले, पण आमचं सरकार सामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
हा फेव्हिकॉलचा जोड, फडणवीसांसोबतची दोस्ती कधीही तुटणार नाही: एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भाषणात जाहिरातीमुळे झालेल्या वादावर पडदा टाकला. आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता,तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि मी आमदार होतो. तेव्हापासून आमची मैत्री होती. हा फेव्हिकॉलचा जोड आहे, कितीही प्रयत्न केले तरी दोस्ती तुटणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले. काही लोक आम्हाला जय विरुची जोडी म्हणतात. पण ही जोडी युतीची आहे. काही लोक स्वार्थासाठी एकत्र आले होते त्यांना जनतेने दूर केले, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला.