• Fri. Mar 20th, 2026

    नवी दिल्लीत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चा दिमाखदार प्रारंभ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 19, 2026
    नवी दिल्लीत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चा दिमाखदार प्रारंभ – महासंवाद

    ​नवी दिल्ली, दि. १९: राजधानीतील नवीन महाराष्ट्र सदनात आज ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा आणि कलाकुसरीचे दर्शन घडवणाऱ्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    ​या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘आयएएस ऑफिसर्स वाईव्हज् असोसिएशन’च्या अध्यक्षा हेमा सोमनाथन यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी केंद्र सरकारच्या हातमाग विभागाच्या विकास आयुक्त डॉ. एम. बीना यांची प्रमुख उपस्थिती होती, तर प्रसिद्ध अभिनेत्री सायली भगत यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून प्रदर्शनाची शोभा वाढवली.

    ​हे प्रदर्शन केवळ साड्यांची विक्री नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा उत्सव आहे. अस्सल पैठणी, हिमरू, खण, नारायणपेठी आणि आकर्षक हॅन्ड पेंटेड साड्या ​तसेच कोल्हापुरी चप्पल आणि विविध पारंपरिक हस्तकला वस्तूंचे स्टॉल्स आहेत.

    ​महाराष्ट्र सदनामार्फत आयोजित या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.

    विणकर आणि कारागिरांना मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांशी जोडण्याचा या प्रदर्शनाचा मुख्य मुख्य उद्देश असल्याचे निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी यावेळी सांगितले.

    ​या प्रदर्शनातर्गत शनिवार, २१ मार्च रोजी एका विशेष फॅशन शोचे सायं. 6.30 वा आयोजन करण्यात आले आहे. २२ मार्च पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुले राहील. दिल्ली व परिसरातील महाराष्ट्रप्रेमी, साडीप्रेमी आणि पर्यटकांना या प्रदर्शनास भेट देऊन ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन श्रीमती विमला यांनी केले आहे.

    या कार्यक्रमास सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, नितीन शेंडे, माहिती संचालक हेमराज बागुल, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सारिका शेलार, राजश्री पाटील, शिखा अजमेरा, स्मिता जाधव यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

    ०००

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed