• Fri. Nov 29th, 2024
    पाऊस लांबल्याने ठाणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचं सावट, काही दिवस पुरेल इतकाच जलसाठा

    म. टा. वृत्तसेवा, ठाणे : जूनचे १५ दिवस उलटले तरी अजूनही मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये तुरळक सरी वगळता पावसाने हजेरी लावलेली नाही. ठाणे जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ३० ते ४५ दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई बुधवारी केले.जिल्हा नियोजन समितीच्या विविध यंत्रणांचा आढावा, तसेच शासन आपल्या दारी, पाणीपुरवठा, शहरांमधील नालेसफाई, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गतच्या तयारीचा आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. पाऊस लांबण्याची शक्यता गृहित धरून ठाणे जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व प्राधिकरणांनी जुलैअखेरपर्यंतचे नियोजन करावे व गरज पडल्यास पर्यायी व्यवस्था करावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

    आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजित सिंग, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, मिरा-भाईंदरचे पोलिस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबई महापालिका आयुक्त मिलिंद भारंबे, जिल्हा पोलिसप्रमुख विक्रम देशमाने यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

    ठाणेकरांची समस्या दूर, दुरुस्ती कामामुळे दोन महिन्यांपासून बंद झालेला मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला!

    नव्या धरणाबाबत मौन

    संभाव्य पाणीटंचाईविषयी चिंता आणि पर्यायी व्यवस्था याविषयी बैठकीत चर्चा झाली. परंतु ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा म्हणून गेल्या १५ वर्षांपासून प्रस्तावित असलेले काळू, शाई, कुशिवली हे धरण प्रकल्प कधी मार्गी लागणार, त्याची सद्यस्थिती काय आहे, याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही.

    ‘विरोधी पक्षनेते टीकाच करणार!’

    ‘महायुती सरकार उत्तम काम करत आहे. त्यामुळे अजित पवार काय म्हणताहेत हे फारसे मनावर घ्यायचे कारण नाही. विरोधी पक्षनेते असल्याने ते विरोध करण्याचे काम करत आहेत आणि सरकारची कामगिरी पाहता ते त्यांना दीर्घकाळ करावे लागणार आहे,’ असे पालकमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed