• Sun. Sep 22nd, 2024

पाऊस लांबल्याने महाराष्ट्रावर काळजीचे ढग, शेतकरी चिंतेत, खरीप पेरणीची चिंताजनक स्थिती समोर

पाऊस लांबल्याने महाराष्ट्रावर काळजीचे ढग, शेतकरी चिंतेत, खरीप पेरणीची चिंताजनक स्थिती समोर

मुंबई : बिपर्जय चक्रीवादळ आणि अल निनोच्या परिणामांमुळे मान्सूनच्या आगमनाला थेट फटका बसल्याने जूनच्या सुरुवातीला पेरणीची तयारी सुरू करणारे शेतकरी यंदा चिंतेत आहेत. राज्यात नऊ जूनपर्यंत सरासरीच्या केवळ ८.८ टक्के पाऊस पडला असून, खरिपाची पेरणी रखडली आहे. राज्यातील खरीप पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी अवघ्या एक टक्का म्हणजे ०.७७ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केल्याची माहिती हाती आली आहे.

राज्य सरकारच्या कृषी विभागाने या संदर्भातील अहवाल मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला. या वेळी पाऊस परिस्थितीचे व शेतीबाबतचे सादरीकरण करण्यात आले. राज्याच्या बहुतांश विभागांमध्ये आकाश कोरडे व निरभ्र होते. कोकण, अमरावती विभागात तुरळक हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर विभागात अशाच पावसाची नोंद आहे. लातूर, नागपूर विभागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. ९ जूनपर्यंत राज्यात ५.५ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या (६२.३ मिमी) ८.८ टक्के इतका असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे.

मान्सून आगमन लांबणीवर; मिठागरांना फायदाच फायदा, १५ जूनपर्यंत चालणार मीठ संकलन

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर असून, ऊस पिकासह हे सरासरी क्षेत्र १५२.९७ लाख हेक्टर आहे. खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून, ९ जूनपर्यंत केवळ ०.७७ लाख हेक्टर म्हणजेच १ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.

विभागनिहाय खरीप पेरणीची स्थिती…

कोकण विभागात

सरासरी पेरणी क्षेत्र : ४. १४ लाख हेक्टर

पेरणी क्षेत्र : ०.०३ लाख हेक्टर (०.७७ टक्के)

नाशिक

सरासरी क्षेत्र : २०. ६५ लाख हेक्टर

पेरणी : ०. ६२ लाख हेक्टर (२.९९ टक्के)

पुणे विभाग

अद्याप पेरणीला सुरुवात नाही.

कोल्हापूर

सरासरी क्षेत्र : ७. २८ लाख हेक्टर

पेरणी झालेले क्षेत्र : ०.०७ लाख हेक्टर (०.९१ टक्के)

छत्रपती संभाजीनगर

सरासरी क्षेत्र : २०. ९० लाख हेक्टर

पेरणी झालेले क्षेत्र : ०.०१ लाख हेक्टर (०.०६ टक्के)

लातूर

सरासरी क्षेत्र : २७. ६७ लाख हेक्टर

पेरणी झालेले क्षेत्र ०.०२ लाख हेक्टर (०.०७ टक्के)

अमरावती

सरासरी क्षेत्र : ३२. ५९ लाख हेक्टर

पेरणी झालेले क्षेत्र : ०.०२ लाख हेक्टर (०.०६ टक्के)

नागपूर

सरासरी क्षेत्र : १९. २५ लाख हेक्टर

पेरणी झालेले क्षेत्र : ०.०००३ लाख हेक्टर

विलंबाने पेरणीचे आवाहन

दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी विलंबाने पेरणी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. २५ मे रोजी झालेल्या खरीप हंगाम पूर्वतयारी बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नका, असे आवाहन केले होते. त्यातच बुधवारी ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने पुढील चार आठवड्यांत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याला भारतीय हवामान खात्यानेही दुजोरा दिला आहे. त्यामुळे सहा जुलैपर्यंत कमी पावसाची शक्यता आहे. परिणामी कृषिप्रधान क्षेत्रात दुष्काळाचाही धोका वर्तवण्यात आल्याने चिंतेचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed