• Fri. Nov 29th, 2024
    लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेची हातोड्याने हत्या, १२ तासात खुनाचा उलगडा, कारण समोर…

    Authored byप्रशांत पाटील | Contributed by संतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Nov 2024, 7:05 am

    Satara Crime News: वाकड येथे सोमवारी दि. २५ रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. जयश्री विनय मोरे (वय २७, रा. मारुंजी, हिंजवडी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे

    हायलाइट्स:

    • खंबाटकी घाटातील अज्ञात महिलेच्या खुनाचे गूढ उकलले
    • अवघ्या १२ तासांच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस
    • साताराऱ्यातील अतिशय धक्कादायक घटना
    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    सातारा खंबाटकी घाट महिला हत्या

    संतोष शिराळे, सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्याजवळील खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. हा मृतदेह वाकड (पुणे) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असलेल्या बेपत्ता महिला जयश्री मोरे हिचा असल्याचे खंडाळा पोलिसांना समजले. त्यामुळे हा गुन्हा खंडाळा पोलिसांनी अधिक तपासासाठी वाकड पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणून एकास अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे सोमवारी दि. २५ रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. जयश्री विनय मोरे (वय २७, रा. मारुंजी, हिंजवडी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. दिनेश पोपट ठोंबरे (वय ३२, रा. बहुर, पो. करुंज, ता. मावळ) असं अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर मृत जयश्री मोरे पतीपासून विभक्त राहत होती. दिनेश ठोंबरे हा हिंजवडी येथील एका कंपनीत सुपरवायझर आहे. त्याचे पहिले लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. दिनेश हा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असायचा. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी दिनेश आणि जयश्री यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. गेल्या चार वर्षांपासून जयश्री आणि दिनेश हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
    https://marathi.indiatimes.com/maharashtra/palghar/vasai-road-station-to-become-terminus-railway-minister-gives-green-light/articleshow/115787577.cms

    लिव्ह इन रिलेशनमध्ये असताना त्यांना तीन वर्षांचा मुलगा असल्याचे सांगण्यात आले. जयश्री व दिनेश यांचे काही दिवसांपासून विविध कारणांवरून पटत नव्हते. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करत वेगळे राहायचं म्हणत होती. रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी दोघेही पुणे येथील भूमकर चौक येथे गाडीत असताना दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दिनेशने गाडीत ठेवलेल्या हातोड्याने जयश्रीच्या डोक्यात वर्मी घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिनेश हा सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंबाटकी घाटात गाडी घेऊन गेला. तेथे घाटात जयश्रीचा मृतदेह फेकला. त्यानंतर दिनेश पिंपरी- चिंचवडमध्ये परत गेला. सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी दिनेश ठोंबरे याने जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली.

    दरम्यान, खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह दिसून येत असल्याबाबत एका प्रवाशाने पोलीस कंट्रोलला ११२ नंबरला कॉल करून सांगितले. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी खंबाटकी घाटात धाव घेत पोलीस कर्मचारी व खंडाळा तालुका रेस्क्यू टीमच्या साह्याने मृतदेह दरीतून वर काढण्यात आला. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या आदेशान्वये पोलीस उपअधीक्षक राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर, खंडाळा पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के, पोलीस हवालदार संजय जाधव, संजय पोळ, शरद तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन महांगरे, अमित चव्हाण यांनी दूरदृष्टी दाखवत मिसींग व्यक्तींबद्दल ऑनलाईन तपासणी केली असता मिळतेजुळते वर्णनाची महिला वाकड येथून बेपत्ता असल्याबाबत माहिती मिळाली.
    https://marathi.indiatimes.com/india-news/ajit-pawar-says-he-will-get-the-finance-ministry-of-maharashtra-make-the-record-of-presenting-budget/articleshow/115787235.cms

    जयश्रीचे वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती वाकड पोलिसांना दिली असता खंडाळा पोलीस व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली असता यामागे दिनेश ठोंबरेच असल्याचं पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर समोर आले. बनाव करण्यासाठी दिनेश याने जयश्रीच्या तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिल्याचे निदर्शनास आले. याबाबतची पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्टदेखील व्हायरल केली होती. ज्यानंतर लहान मुलगा आळंदी पोलिसांना मिळून आला होता. खंडाळा पोलिसांचे सहकार्याने वाकड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या १२ तासांत गुन्हा उघडकीस आणून दिनेश याला अटक केली.

    सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक निरीक्षक सुभाष चव्हाण, उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे, भारत माने, श्रेणी उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, पोलिस अंमलदार वंदु गिरे, नामदेव वडेकर, रामचंद्र तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed