म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एकीकडे खाद्यतेलांचे आणि भाजीपाल्याचे दर कमी होत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे, तर दुसरीकडे तूरडाळीच्या वाढत्या दरांमुळे घरखर्चाचे बजेट कोलमडले आहे. महिनाभरात तूरडाळीच्या दरांत तब्बल तीस रुपयांपर्यंतची वाढ झाल्याने वरण महागणार आहे. किरकोळ बाजारात तूरडाळीचा दर १६० रुपये किलोवर पोहोचला आहे.महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश या प्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये गेल्यावर्षी मुसळधार पाऊस होऊन शेतांत पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे चांगल्या प्रतीच्या तूरडाळीचे उत्पन्न घटले आहे. अशातच कॉर्पोरेट कंपन्यांनी केलेल्या साठवणुकीमुळे आठवडाभरापासून तूरडाळीची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. यंदाचा मान्सूनही लांबण्याची शक्यता आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच तूरडाळीचा भाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी १२५ ते १३० रुपये किलो असलेली तूरडाळ आता १५५ ते १६० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. काही ठिकाणी उच्च प्रतीच्या तूर डाळीसाठी ग्राहकांना १७० रुपयेदेखील मोजावे लागत आहेत. दरम्यान, हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. तूरडाळ महागल्याने सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितावर त्याचा परिणाम झाला असून, महिलावर्गाचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. बाजारात तूरडाळीच्या दरांत वाढ होत असली तरीही इतर डाळींचे दर काही प्रमाणात स्थिर असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
म्हशीचे दूध पुन्हा महागले
नाशिककरांच्या चहालाही महागाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे दिसून येत आहे. दूध बाजारात गायीच्या दुधाचे दर स्थिर असले तरी म्हशीच्या दुधाचे दर सातत्याने वाढत आहे. पंधरा दिवसांपूर्वी ८२ ते ८४ रुपये लिटर असलेल्या म्हशीच्या दुधाच्या दरांत आता पुन्हा वाढ झाली असून, ते ९० रुपये लिटरपर्यंत पोहोचले आहे. दुधाचा पुरवठा कमी होत असल्याने दरात वाढ होत असल्याचे दूध व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. दूध बाजारात गायीच्या दुधाचे दर मात्र ५४ ते ५६ रुपयांवर स्थिर आहे.
डाळींचे दर (प्रति किलो)
हरभरा : ७०-७५
उडीद : १२०-१३०
मूग : ११५-१२०
मसूर : १०० ते ११०
प्लास्टिकविरोधी कारवाईचा बोजवारा; ११ महिन्यांत केवळ ४ हजार ६६४ किलो प्लास्टिक जप्त
असे आहेत दर
भाज्यांचे दर (प्रतिकिलो / रुपयांत)
भाजी बाजार समिती जत्रा हॉटेल परिसर सिडको परिसर गंगापूररोड
हिरवी मिरची ३० ४० ४० ६०
टोमॅटो १० ते १५ ३० ३० ४०
वांगी ३० ४० ४० ६० ते ८०
गवार ६० ते ७० १०० १०० १००
भेंडी २० ४० ४० ८०
काकडी ४० ६० ६० ६०
मेथी १० (मोठी जुडी) १५ १५ ३०
पालक ८ (मोठी जुडी) १५ १५ २०
शेपू १० (मोठी जुडी) १५ १५ २५
कोथिंबीर १० (मोठी जुडी) १० १० १५