• Mon. Nov 25th, 2024

    खबरदार, छाटणीच्या नावाखाली झाडे तोडाल तर; ठाणे महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा

    खबरदार, छाटणीच्या नावाखाली झाडे तोडाल तर; ठाणे महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : पावसाळा तोंडावर आला असताना ठाणे महापालिका हद्दीत तब्बल पाच हजार ६३३ धोकादायक फांद्यांच्या छाटणीचे काम अद्यापही शिल्लक आहे. उद्यान विभागाच्या या कासवगती कारभाराबाबत ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी असमाधान व्यक्त केले आहे. तसेच झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्याच्या नावाखाली एकही झाड उद्ध्वस्त झाले तर त्यात गुन्हा दाखल केला जाईल. जाहिरातीच्या होर्डिंगसाठी झाड तोडल्याचे निदर्शनास आले तर संबंधित अधिकारी जबाबदार असतील. तसेच, ते होर्डिंग काढले जाईल, असा इशाराही आयुक्त बांगर यांनी दिला.पावसाळापूर्व कामांमध्ये धोकादायक झालेल्या फांद्या शास्त्रोक्त पद्धतीने छाटण्याचे काम पालिका प्रशासनाच्या उद्यान विभागाला दिले जाते. यंदा ठाणे महापालिका क्षेत्रात केलेल्या सर्वेक्षणानुसार, सात हजार ८२३ झाडांच्या धोकादायक फांद्या काढाव्या लागणार होत्या. त्यापैकी आतापर्यंत दोन हजार १९० झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे कधीही पाऊस कोसळण्याची शक्यता असताना येत्या काही दिवसांत पालिका प्रशासनासमोर पाच हजार ६३३ धोकादायक फांद्या छाटण्याचे आव्हान उभे आहे. उद्यान विभागाच्या पावसाळापूर्व कामांचा आढावा आयुक्त बांगर यांनी नुकताच घेतला. त्यावेळी कामाच्या गतीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले. तसेच धोकादायक फांद्या काढण्याचे काम काळजीपूर्वक केले तर भविष्यातील दुर्घटना टाळता येतील, असे सांगितले.
    विशेष कक्ष स्थापन करणार का? ‘मॅनहोल्स’च्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने बीएमसीला सुनावले
    ‘खिळे काढा, बुंधे मोकळे करा’

    महापालिका क्षेत्रात झाडांवर ठोकलेले हे खिळे काढून टाकावेत, त्यासाठी मोहीम हाती घ्यावी. काँक्रीटमध्ये जखडलेले झाडांचे बुंधे व्यवस्थितपणे मोकळे करावेत, अशा सूचनाही बांगर यांनी दिल्या. आवश्यक असेल तेथे वृक्ष छाटणी करण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीत किमान एक वाहनाचे नियोजन करण्यात यावे. झाडाच्या फांद्या कापण्यासाठी कामगाराला झाडावर चढवण्यातही दुर्घटना होण्याचा संभव असतो. त्यामुळे आवश्यक ती सुरक्षा पुरवूनच हे काम केले जावे, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed