म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : काळबादेवी, झवेरी बाजार परिसरात सोने, चांदी दागिन्यांचा व्यवसाय करणारे लहान-मोठे असंख्य कारखाने आहेत. या कारखान्यांतून धूर ओकणाऱ्या चिमण्या व अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर गेल्या काही वर्षांपासून महापालिकेची कारवाई थंडावली आहे. शुक्रवारी या परिसरात धनजी स्ट्रीटवरील इमारतीत लागलेल्या आगीने धूर ओकणाऱ्या चिमण्या व अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.दक्षिण मुंबईतील सी विभाग हा व्यावसायिक परिसर म्हणून ओळखला जातो. ८० ते १०० वर्षांपासून दाटीवाटीने वसलेल्या हजारो निवासी इमारती या विभागात आहेत. येथील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक निवासी गाळ्यांचे व्यावसायिक गाळ्यात रूपांतर झाले आहे. इमारतीत गोदामे, वाढवलेली बांधकामे, इमारतींच्या समोर उभ्या केलेल्या वाहनांची गर्दी असून फेरीवाल्यांनीही मोकळ्या जागा अडवल्या आहेत. सोने, चांदी गाळण्याचे काम कारखान्यांतून होत असते. निवासी गाळ्यांचे व्यावसायिक गाळे करून अनधिकृतपणे राहणाऱ्या व्यावसायिकांवर पालिकेची ठोस कारवाई होत नसल्याने हे प्रमाण अद्याप थांबलेले नसल्याचे सांगण्यात येते.
इमारतींचा मालक कोण, व्यवसाय कोणाचा?
येथील बहुसंख्य इमारतीत लाकडी बांधकामे, अरुंद गल्ल्या, गाळ्यांमध्ये व्यावसायिक व निवासासाठी केलेले अवैध बदल मोठ्या प्रमाणात आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले व्यवसाय तसेच सोने, चांदी गाळून धूर ओकणाऱ्या सुमारे सातशेहून अधिक चिमण्या आहेत. सोने, चांदीचे दागिने घडविण्यासाठी आगीचा वापर करावा लागतो. यासाठी अनेक गाळ्यांमध्ये गॅस तसेच रसायनांचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते आहे. कारखाने असलेल्या इमारतींचा मालक कोण, व्यवसाय कोणाचा हे शोधण्यास पालिकेला कठीण जाते आहे.
मुंबईत आज मच्छिमारांचे जन उद्रेक आंदोलन; एका अहवालामुळे घेतली आक्रमक भूमिका
व्यावसायिक विभागाची मागणी
या परिसरात इमारतींमधील गाळ्यांमध्ये हजारो लहान मोठे कारखाने आहेत. बहुसंख्य बंगाली मालक, कारागिरांमार्फत हे कारखाने चालवले जातात. कोंदट जागेतील एकेका गाळ्यामध्ये २० ते २५ कामगार काम करतात. या कारखान्यांचा व्यवसाय झवेरी बाजार, चर्नी रोड येथील सोने, चांदी, हिरे व्यापाऱ्यांशी निगडीत आहे. त्यामुळे काळबादेवी सोडून अन्य ठिकाणी जाता येत नाही. राज्य सरकारने या परिसरातच सोने, चांदी, हिरे व्यवसायाशी संबंधित विशेष विभाग बनविल्यास सर्व व्यवसाय एका छताखाली आणता येईल, अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जाते आहे.