• Sat. Sep 21st, 2024

पद वाटपावरून राडा, शिंदे गटाच्या दोन महिला नेत्या पोलीस स्टेशनमध्येच भिडल्या

पद वाटपावरून राडा, शिंदे गटाच्या दोन महिला नेत्या पोलीस स्टेशनमध्येच भिडल्या

नाशिक : नाशिकमध्ये शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच राडा केल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसमोरच एकमेकांना महिला पदाधिकारी भिडल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी शोभा मगर आणि लक्ष्मी ताठे यांच्यात हा वाद झाला आहे. शिंदे गटातील पद वाटपावरून हा वाद झाल्याची माहिती मिळाली आहे.
Pune Loksabha:महाविकास आघाडीत वाद, फडणवीसांनी डाव टाकला; हुकमी नेत्याला दिले तयारीचे आदेश

शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. याच दरम्यान पद वाटपाबाबत काही महिलांमध्ये चर्चा सुरु असतांना बाचाबाची झाली. यामध्ये जातीवाचक शिवीगाळ झाल्याने महिला पदाधिकारी यांच्यातील राडा थेट पोलीस ठाण्यात पोहचला. त्यानंतर पोलीस ठाण्यातच पुन्हा एकदा शिवसेनेच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे आणि शोभा मगर एकमेकांना भिडल्या. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, लक्ष्मी ताठे यांनी शोभा मगर यांच्यासह त्यांचा मुलगा आणि शिंदे गटातील काही महिला पदाधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुठले पद घ्यायचे याबाबत चर्चा करत असताना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप ताठे यांनी केला आहे. याशिवाय ज्या पक्षात शोभा मगर जातात तिथे त्या महिलांमध्ये वाद घालत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासणारी ही महिला आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. शोभा मगर यांचा मुलगा धीरज मगर हा गुन्हेगार असून त्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती असा देखील गंभीर आरोप ताठे यांनी केला आहे.

कल्याण लोकसभेत मोठा तिढा; भाजपमध्ये तीव्र नाराजी, असहकाराची भूमिका; श्रीकांत शिंदे अडचणीत?

मगर यांच्यासोबत असलेल्या महिला आणि पुरुषांनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांसमोर माझ्यावर हल्ला केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लक्ष्मी ताठे यांनी केली. अन्यथा मी माझ्या समाजाच्या लोकांना घेऊन उपोषण करेल, असा इशारा देखील दिला. तर दुसरीकडे ज्यांच्यावर आरोप करण्यात आले त्या शोभा मगर यांनी लक्ष्मी ताठे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मी जातीवाचक शिवीगाळ केली नाही. त्यांनी तक्रार दाखल करू द्या, मग मी बोलेन अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. एकंदरीतच लक्ष्मी ताठे यांनी केलेल्या आरोपावर थेट उत्तर न देता मगर यांनी बोलणं टाळलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed