• Fri. Nov 15th, 2024

    शेअर्स ट्रेडिंग फसवणूक प्रकरणातील पूजा भोईरच्या पोलिस कोठडीत वाढ; पोलीस तपासात काय आढळलं?

    शेअर्स ट्रेडिंग फसवणूक प्रकरणातील पूजा भोईरच्या पोलिस कोठडीत वाढ; पोलीस तपासात काय आढळलं?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : इन्स्टाग्रामवर ‘रील्स’ बनविण्यासह मराठी बालकलाकाराची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या संशयित पूजा विशांत भोईरच्या बँक खात्यासह मालमत्ता आणि सर्व व्यवहारांची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे.
    नाशिकमधील पोलिस कोठडीत वाढ झाल्यानंतर तपासामध्ये तिने शेअर्स घोटाळा करताना विदेश दौरे केल्याची माहिती पुढे येत आहेत. त्यामध्ये केलेला खर्च, आलिशान कार आणि फ्लॅटसह इतर व्यवहारांची पडताळणी आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्लू) करीत आहे. तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याने अतुल सोहनलाल शर्मा (वय ६६, रा. सिरीन मिडोज, गंगापूररोड) यांनी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार एप्रिलअखेरीस पूजा भोईर (वय ३२) आणि विशांत विश्वास भोईर (३५, रा. कल्याण, ठाणे) या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वीच, संशयित पूजावर मुंबईतही गुन्हा दाखल झाल्याने तिला पोलिसांनी अटक केली.

    ‘अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास ७.७ टक्के मोबदला देण्याचे सांगत तिने अनेकांना गंडा घातला आहे. मुंबईत सोळा लाखांचा अपहार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तिची कोठडी घेतली आहे. या ‘शेअर घोटाळा-२’च्या तपासकामी उपनिरीक्षक रुपेश केदार यांच्या पथकाने ठाण्यातही अधिक चौकशी केली. त्यानुसार पूजाच्या बँक खात्यांमध्येही बरेच व्यवहार आढळून आले आहेत. तिचा पती विशांत पसार झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. पूजाने अनेकांना फसविल्याच्या तक्रारी पुढे येत असून, त्यामध्ये नाशिक-मुंबईतील ‘बड्या’ लोकांचाही समावेश आहे. दरम्यान, पूजाने दिलेले चेकही बाउन्स झाल्याचे समोर आले आहे. तिची मुलगी मराठी मालिकांमध्ये बालकलाकार असल्याने या शेअर्स घोटाळ्याला ‘हायप्रोफाइल’ वलय निर्माण झाले आहे.
    Pooja Bhoir: शेअर्स घोटाळ्यात ‘ग्लॅमर’; मुंबईनंतर आता पूजा भोईरचा नाशिकमधील कारनामा समोर, काय आहे प्रकरण?
    तपासात काय आढळले?

    -पॅरिस, बँकॉक, थायलंडसह इतर देशांत दौरे
    -पूजाचा आलिशान फ्लॅट, विदेश वाऱ्यांचाही ‘हिशेब’ सुरू
    -डीमॅट खात्यात तीन कोटी ३० लाख रुपये
    -२७ लाखांचे सोने गहाण ठेवत २६ लाख घेतले
    -नाशिकच्या सोनार व्यावसायिकाचीही चौकशी
    -गहाण सोन्यासह मालमत्तेचा तपास सुरू
    -आतापर्यंत ८० लाखांचा परतावा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed