काय आहे प्रकरण?
राज्यात उद्योगवाढ व्हावी व उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने अनेक योजना जाहीर केल्या. या योजनेंतर्गत सूक्ष्म व लघु उद्योजकांना शासनाकडून अनुदान देण्यात येते. यवतमाळ येथील जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांच्याकडेच अकोल्याचा प्रभार आहे. निकम हे नियमित राहत नसल्याने जिल्हा उद्योग केंद्राचा कारभार लिपिक तथा निम्न टंकलेखक राठोड हाच सांभाळतो. वरिष्ठांचा विश्वास संपादन करून राठोड याने सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठीचे अनुदान २०१८पासून बनावट दस्तावेज तयार करून उचलणे सुरू केले. दर महिन्यात जिल्हास्तरावर सूक्ष्म व लघु उद्योजकांना वाटण्यात आलेल्या अनुदानाची पाहणी महाव्यस्थापकाकडून केली जाते. ई-मेलद्वारे त्याची प्रत विभागीय कार्यालय अमरावतीकडे पाठविण्यात येते.
महाव्यवस्थापक निकम यांनी विभागीय कार्यालय अमरावती यांच्याकडे पाठविलेली व यवतमाळ जिल्हा उद्योग केंद्रातील यादीची पाहणी केली असता त्यांना मोठी तफावत आढळून आली. त्यानंतर राठोड याने खोट्या स्वाक्षरी करून यादी पाठविल्याचे व त्यातून कोट्यवधीचा अपहार केल्याचे आढळून आले. त्यानंतर चौकशी सुरू झाल्यावर राठोड याने खोटे दस्तावेज तयार करून रकमेचा अपहार केल्याचे मान्य केले. यानंतर निकम यांनी लोहारा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या आधारावर राठोडसह सहा उद्योजकांवर भादंवि कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहे.