• Sat. Sep 21st, 2024

Nashik News : पावसाळ्यात बांधकामांमुळे रस्ते खचले तर परवाने रद्द करू; नगररचना विभागाचा इशारा

Nashik News : पावसाळ्यात बांधकामांमुळे रस्ते खचले तर परवाने रद्द करू; नगररचना विभागाचा इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : गेल्या पावसाळ्यात शहरात अनेक ठिकाणी बांधकामांमुळे रस्ते खचण्याचे प्रकार घडले होते. यामुळे यंदा असे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाने अगोदरच दक्षता घेतली आहे. नवीन बांधकाम व इमारतीच्या बेसमेंटसाठी तळघर खोदकाम करताना आपातकालीन उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्यास किंबहुना पाणी साचून दुर्घटना घडल्यास संबंधित विकसक, आर्किटेक व स्ट्रक्चरल इंजिनीअर जबाबदार असतील, असा इशारा नगररचना विभागाने दिला आहे. यासंदर्भातील पत्र क्रेडाई, नरेडको या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांना दिले आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील १०७७ धोकेदायक इमारती, घरे, मोडकळीस आलेले जुने वाडे हटवण्यापाठोपाठ आता नवीन बांधकामांकडे मोर्चा वळवला आहे. महापालिकेकडून दरवर्षी दरवर्षी मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून शहरातील धोकेदायक मिळकतींना नोटिसा देण्याचे सोपस्कार केले जातात. मात्र नोटिसा निव्वळ फार्स ठरत असून, नोटीस दिल्यानंतर पुढील पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होत नाही. त्यामुळे रहिवाशी याच ठिकाणी जीव मुठीत धरून राहतात. त्यामुळे धोकेदायक वाडे व इमारतींवर कारवाई करण्यासाठी नगररचना विभागाने हालचाली सुरू केल्या असतानाच आता नवीन बांधकामांकडे मोर्चा वळवला आहे.

Cyclone Biporjoy : राज्यावर ३ दिवस अस्मानी संकट, चक्रीवादळामुळे मुंबईसह या भागांना धोक्याचा इशारा
पावसाळ्यात रस्त्यालगत बांधकाम सुरू असल्यास रस्ता खचण्याच्या घटना घडतात. त्यामुळे यंदा पावसाळ्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ व ६९ अन्वये बांधकाम परवानगी देताना आवश्यक सुरक्षा व जबाबदारीसंदर्भात अटींनुसार दक्षता घ्यावी, अशा सूचना नगररचना विभागाने शहरातील बांधकाम व्यावसायिकांना दिल्या आहेत. नगररचना विभागाने क्रेडाई, नरेडको यांच्यासह आर्किटेक्ट संघटनेला याबाबत पत्र दिले आहे. रस्त्यालगत बांधकाम सुरू असताना रस्ता खचल्यास थेट बांधकाम परवानगी रद्द करण्याचा इशारा नगररचना विभागाने दिला आहे.

पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना

गेल्या वर्षी शहरातील गोविंदनगर भागातील वर्दळीचा रस्ता पावसाळ्यात खचला होता. रस्त्यालगतच्या भूखंडावर संबंधित बिल्डरने मोठ्या प्रमाणात खोदकाम केले होते. खोदकाम व्यतिरिक्त, मातीची धूप झाल्याने नुकसान होऊन रस्ता खचला होता. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक थांबवावी लागली होती. या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

शहरात अनेक ठिकाणी गगनचुंबी इमारतींसाठी खोदकाम केले जात आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पाणी साचून दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे क्रेडाई, नरेडको यांना पत्र देऊन बांधकाम करताना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास विकसक, आर्किटेक्ट, इंजिनीअरवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल.

– संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता, नगररचना, महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed