मुंबईत बेस्टची पहिली वाहतूक १५ जुलै १९२६मध्ये सुरू झाली. त्यापूर्वी मुंबईत ट्राम धावत होती. कालांतराने यात बदल होत गेले आणि सिंगल डेकर बसच्या जोडीला डबल डेकर बसही सेवेत आल्या. बेस्टची पहिली डबल डेकर बस ८ डिसेंबर १९३७ मध्ये सुरू झाली. या बसला प्रवाशांची चांगली पसंती मिळाली. सिंगल डेकर बसची प्रवासी क्षमता कमी असल्याने डबल डेकर बसगाड्या वाढवण्यावर बेस्ट उपक्रमाने भर दिला.
साधारण १५ ते १६ वर्षांपूर्वी बेस्टकडे ९०१ डबल डेकर बस होत्या. बसचे पंधरा वर्षांचे आयुर्मान, तांत्रिक समस्या इत्यादी कारणांमुळे याची संख्या हळूहळू कमी होऊ लागली. डिसेंबर २०१९मध्ये डबल डेकर बसचा ताफा कमी होऊन १२० झाला. २०२२-२३मध्ये ४५ डबल डेकर बस होत्या. आता हीच संख्या ३३ असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यामध्ये मुंबई दर्शन घडवणाऱ्या पर्यटनाच्या तीन ओपन डेक बसही आहेत.
एका बसची कालमर्यादा पंधरा वर्षे असते. या बस कालबाह्य होत असून, येत्या सप्टेंबरपर्यंत ३३ बस कालबाह्य होणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर अशा प्रकारची एकही बस प्रवाशांच्या सेवेत नसेल. यापुढे एसी डबल डेकर बसच प्रवाशांसाठी चालवण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
यापुढे एसी डबल डेकरच धावणार
सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात १२ एसी डबल डेकर बस आहे. त्यापैकी चार बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. एकूण ९०० डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे उद्दिष्ट बेस्ट उपक्रमाने ठेवले आहे. यापैकी २०० डबल डेकर बसचे काम एका कंपनीला देण्यातही आले. मात्र, या बस सेवेत येण्यासाठी बराच विलंब होत आहे. त्यातच ७०० डबल डेकर बस आणि ५० एसी डबल डेकर पर्यटन बससाठीही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, ती अंतिम होत आहे. त्यामुळे नॉन एसी बस ऑक्टोबरनंतर सेवेत नसल्यास एसी डबल डेकर बसची संख्या वाढवण्याशिवाय बेस्टला पर्याय राहणार नाही.