खासगी रुग्णालयात अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करण्यासाठी जास्त पैसे लागतात. कॅथलॅब केंद्र सुरू झाल्यावर गरीब रुग्णांना येथे उपचार घेता येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये हृदयविकारावर उपचार घेण्यासाठी सुविधा पूर्वी उपलब्ध नव्हती. सरकारी रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून गेल्या वर्षी राज्यातील काही जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅथलॅब केंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार पुणे-जिल्हा रुग्णालयात कॅथलॅब केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
कॅथलॅब केंद्राचे फायदे – अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करता येणार – गरीब रुग्णांना कमी पैशात उपचार मिळणार – ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार घेता येणार – ससून रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होणार – विविध तपासण्या करता येणार
अखेर मेट्रो रक्तपेढीला परवानगी
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयामधील मेट्रो रक्तपेढी प्रलंबित होती. रक्तपेढी सुरू करणे आवश्यक असतानाही रुग्णालय प्रशासन पाठपुरावा करीत नसल्याचे चित्र होते. मात्र, कित्येक वर्षांनंतर आता मेट्रो रक्तपेढी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून, रक्तपेढी सुरू करण्यासाठीची परवानगी मिळाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. पुढील महिन्यात रक्तपेढी सुरू होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. मेट्रो रक्तपेढी नसल्याने रक्तातील इतर घटक वेगळे करता येत नाहीत. ही रक्तपेढी सुरू झाल्यावर प्लाझ्मा, प्लेटलेट्स, फ्रेश प्लाझ्मा असे घटक वेगळे करता येणार आहेत; तसेच रक्तसंकलनाची क्षमता वाढणार आहे.
कॅथलॅब केंद्र सुरू करण्यासाठी सध्या निविदा काढण्यात आली आहे. इमारतीचे ७५ टक्के काम पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. केंद्र सुरू करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मेट्रो रक्तपेढीसाठी- शुल्क भरले असून, लवकरच सुरू करण्यात येणार आहे. – डॉ. नागनाथ यम्पल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध रुग्णालय