हा प्रसंग आहे कोल्हापुरातला आणि विद्यार्थ्याचं नाव आहे समर्थ सागर जाधव… समर्थ कोल्हापुरातील एस एम लोहिया या हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत होता. शाळेत अभ्यासात कमी आणि दंगा करण्यात एक नंबर असलेला मुलगा. त्यामुळे शाळेतील अनेक मित्र त्याला तू पास होणार नाही असे वर्षभर चिडवत राहिले. मात्र पठ्ठ्याने आपलं लक्ष विचलित न होता अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत तब्बल ५१ टक्के गुण घेत पास झाला.
जे मित्र तू पास होणार नाही म्हणत होते त्याच मित्रांनी त्याची उंटावर बसवून कोल्हापूरच्या गंगावेश परिसरातून त्याची मिरवणूक काढली. गुलालाची उधळण करत आणि वाजत गाजत पेढे भरवत मिरवणूक काढल्याने या मिरवणुकीची चर्चा सध्या संपूर्ण कोल्हापुरात होत आहे.
दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात आपण ‘समर्थ’ असल्याचे दाखवून देत ५१ टक्के गुण मिळवून समर्थ पास झाला. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याची भविष्यवाणी करणारे तोंडावर पडले. पण समर्थला आश्चर्याचा धक्का देत त्यांनी त्याची उंटावरुन मिरवणूक काढत समर्थच्या यशाचा आनंद व्यक्त केला.
निकालात मुलींचा दबदबा….
निकालात मुलींचा दबदबा पहायला मिळाला. बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही मुलांच्या तुलनेत मुलींनी निकालात बाजी मारली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातून ७९ हजार ३६१ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी ७५ हजार ९२४ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.६६ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत हे प्रमाण ४. ४१ टक्क्यांनी अधिक आहे. विभागात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.२५ टक्के असे आहे. लातूर विभागातून ४७ हजार ४४९ मुलींनी परीक्षा दिली. यापैकी ४५ हजार ९५ मुली उत्तीर्ण झाल्या. निकालाची टक्केवारी ९५.०३ अशी आहे. मुलांच्या तुलनेत ४.३८ टक्क्यांनी मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०. ६५ असे आहे.