रेणापूर येथील रहिवाशी असलेले गिरिधारी केशव तपघाले (वय ५०) मजुरी करून संसाराचा गाडा ओढत होते. कधी हाताला काम मिळायचं तर कधी तसेच दिवस जात असे. त्यामुळे आर्थिक ओढाताण नेहमीची होती. त्यामुळे बिकट परिस्थितीत त्यांनी तीन महिन्यांपूर्वी लक्ष्मण मारकड या सावकाराकडून तीन हजार रुपये घेतले होते.
मध्यंतरी पैशांसाठी सावकार लक्ष्मण मारकड सारखा तगादा करू लागला. पण, गिरिधारी यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पैसे परत करण्यास तीन महिन्यांचा विलंब झाला. दरम्यान, लक्ष्मण मारकड याने पैशांसाठी गिरिधारी यांना जीवे मारण्याच्या अनेक वेळा धमक्या दिल्या. त्यामुळे गिरिधारी यांनी पैशांची तजवीज करून आठ दिवसांपूर्वी लक्ष्मण मारकड याला रक्कम परत करण्यासाठी त्याच्या घरी गेले. पण ३ महिन्यात ३ हजार रुपयांचे अव्वाच्या सव्वा कर्ज लक्ष्मण मारकड याने मागितले.
जास्तीच्या रकमेची तजवीज आपण करू शकत नसल्याचे सांगताच लक्ष्मण मारकड आणि त्यांच्या नातेवाईकांनी गिरिधारी यांना जातीवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्यांचा हात मोडला. यानंतर त्यांना लातूर येथील विलासराव देशमुख शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, रेणापूर पोलीस ठाण्यात लक्ष्मण मारकड याच्या विरोधात तक्रार केल्यावर पोलिसांनी त्याला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. परवा गुरुवारी रात्री गिरिधारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने ते घरी गेले. मात्र, दलित असूनही पोलिसात गेल्याचा राग मनात धरून लक्ष्मण मारकड आणि अन्य काही जण शुक्रवारी सकाळी गिरीधारी यांच्या घरी जाऊन लक्ष्मण मारकड यांना डोळ्यात मिरची टाकून अमानुष मारहाण केल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलंय. यावेळी त्यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. यात गिरिधारी पुन्हा गंभीर जखमी झाले.
नातेवाईकांनी आरडाओरड केल्यावर लक्ष्मण मारकड तेथून पळून गेला. त्यानंतर गिरीधारी यांचा मुलगा सचिन आणि पुतण्या रविकांत यांना रस्त्यावर गाठून मारहाण करण्यात आली. गिरीधारी यांना विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. मात्र, रात्री उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सदर मारहाणीची घटना रेणापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली. मात्र, पोलिसांनी तक्रार करूनही आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप गिरीधारी यांच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत संबंधित पोलिस अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करणार नाही आणि आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा गिरीधारी यांच्या नातेवाईकांनी केला आहे.