अमरावती, दि. 3 : राज्यातील मोजक्या शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांत विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा समावेश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार संस्थेत आवश्यक दोन वसतिगृहांसाठी, तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी निधी मिळवून देण्यात येईल. याबाबत संस्थेच्या अधिका-यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे केले.
मंत्री श्री. पाटील यांनी विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, तसेच परिसरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, संचालक डॉ. अंजली देशमुख आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची शैक्षणिक परंपरा मोठी आहे. संस्थेत आवश्यक त्या सर्व सुविधा उभारल्या जातील. भारतीय प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातील युवकांचा टक्का वाढावा यासाठी राज्य शासनाव्दारे सहा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल. युपीएससी परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना चांगले यश मिळावे यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न होत आहेत. त्यात दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या जुन्या इमारतीत मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, तेथे मार्गदर्शन वर्गही सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या वर्गाला दिल्ली येथील अनुभवी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळू शकेल व त्याचा फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, राज्य शानाच्या सारथी, बार्टी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था व महाज्योती या संस्थांद्वारा विविध प्रवर्गांतील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थांतून स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या वाढलेली असून त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिक सोयी सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत आहेत
विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या राज्यातील सुमारे 200 मुलांना विविध शिष्यवृत्ती योजनांत पाच वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून देण्यात येत आहे. याचा सर्व समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी केले. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या येथील प्रशिक्षण केंद्राच्या गुणवंत विद्यार्थी शिवम बुरघाटे, वैशाली धांडे, केतकी बोरकर आदींचा गौरव यावेळी झाला.
000