• Sat. Sep 21st, 2024

पन्नास लाखांचा हिशेब तर द्यावाच लागेल, चौंडीच्या कार्यक्रमावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

पन्नास लाखांचा हिशेब तर द्यावाच लागेल, चौंडीच्या कार्यक्रमावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

अहमदनगर : चौंडी (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी झालेल्या सरकारी कार्यक्रमासाठी सरकारने पन्नास लाखांचा निधी दिला आहे. हा जनतेचा पैसा आहे. प्रत्यक्षात तेथे आलेल्या सुमारे २२ हजार लोकांच्या जेवणापासून ते सजावटीपर्यंतचा खर्च आम्ही केला आहे. मग या पन्नास लाखांतून फक्त कमानी आणि मंडप उभारला का? यासंबंधी कोणी तरी नक्कीच माहितीच्या अधिकारात माहिती मागवेल, सरकारला याचा हिशोब द्यावाच लागेल. आम्हीही याचा पाठपुरावा करू, अशी प्रतिक्रिया कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. या कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याला पुण्याश्लोक अहिल्यानगर नाव देण्याच्या घोषणेचे पवार यांनी स्वागत केले. सोबतच जिल्ह्याचा समतोल विकास झाला तर विभाजनाची गरज पडणार नाही, असेही मत व्यक्त केले.

आमदार पवार यांनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये चौंडीत झालेल्या कार्यक्रमावर त्यांनी भाष्य केले. चौंडीत सरकारी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असला तरी तेथे बहुतांश सुविधा आम्ही कर्जत जामखेडमधील नागरिकांतर्फे केल्या होत्या. हे समाजकारण आहे. आम्ही जेवणाची व्यवस्था केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. डॉक्टरांची व्यवस्था केली. रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. तर दुसरीकडे सरकारकडून हारांचीही व्यवस्था नव्हती. त्यांनी केवळ सभा मंडप, कमानी आणि भाषणे यावरच भर दिला होता. त्यामुळे यासाठी पन्नास लाखांचा खर्च आला का? हे विचारले जाईलच. गेल्यावर्षी आम्ही लोकांच्या सहभागातून कार्यक्रम केला होता. तो सरकारी नव्हता. तरीही आम्ही राजकीय वक्तव्य टाळली होती. यावेळी सरकारी निधीतून कार्यक्रम असूनही याचे भान राखले गेले नाही.

Ahmednagar News: नगरच्या नामांतराची घोषणा झाली, पण हे काम राहून गेलं, रोहित पवारांनी दिली आठवण आणि इशाराही
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांचे नाव जिल्ह्याला दिले याचे स्वागत करतो. मात्र, ही खूप मोठी प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा थाटात घोषणा केली की, कार्यक्रमानंतर लगेच नाव बदलणार आहे. मात्र, यासाठी असलेली मोठी प्रक्रिया सरकारने लगेच सुरू करावी. ती लवकर पूर्ण करून घोषणा प्रत्यक्षात आणावी. अन्यथा तो केवळ भावनांशी खेळ ठरेल. याच दिवशी सरकारने बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवींचे नाव दिले. त्याचेही आम्ही स्वागत करतो. ते महाविद्यालय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पुढाकारातून झाले आहे. तसेच महाविद्यालय नगर जिल्ह्यात झाले असते, त्याची घोषणा चौंडीतील कार्यक्रमात झाली असती आणि त्यालाही अहिल्यादेवींचे नाव दिले असते तर स्वागतच झाले असते, असे नामांतराच्या मुद्द्यावर रोहित पवार बोलले.
कार्यक्रमावर छाप, नाव घेताच टाळ्या अन् शिट्ट्या, मुख्यमंत्र्यांची शाबासकी, पडळकर ‘अहिल्यानगर’चे हिरो!
नामांतराचे श्रेयही कोणा एकाने घेऊ नये. ही अनेकांची मागणी होती, अनेकांनी यासाठी प्रयत्न केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी जात धर्म यांचा विचार न करता काम केले आहे, याचाही विचार केला पाहिजे. नामांतरासोबतच धनगर आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागला पाहिजे. हे सांगतात डबल इंजिनची सत्ता आहे. आरक्षणाचा मुद्दा मोठ्या इंजिनकडे म्हणजे केंद्र सरकारकडे आहे. तर मग यांचे छोटे इंजिन ही मागणी तेथे योग्य पद्धतीने का लावून धरीत नाही, असा सवालही आमदार पवार यांनी केला.

जिल्हा विभाजानाची मागणी होत असते ती असमान विकासामुळे. आतापर्यंत जिल्ह्याचा असमान विकास झाला आहे. त्यामुळे लोक ही मागणी करतात. मात्र, विकासाचा समतोल राखला गेला तर विभाजनाची मागणी राहणार नाही. राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा हा आपला मान कायम राहील, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed