रस्त्याचं काम सुरू असताना गावकऱ्यांना बोगस काम सुरू असल्याची शंका आल्याने गावकऱ्यांनी या कामाचं पितळ उघडं पाडलं असून त्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रस्त्याच्या बोगस कामाची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नागरिकांनी अक्षरशः रस्ता हाताने चादरी सारखा उचलून त्याखाली असलेली प्लास्टिक पन्नी दाखवली. यामुळे बोगस काम करण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. आता नागरिकांनी या संपूर्ण कामाची चौकशी करून सदरील कंत्राटदार आणि अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कर्जत ते हस्त पोखरी हा जालना-अंबड महामार्गाला जोडणारा एकूण १० किलोमीटरचा रस्ता आहे. त्यापैकी ९.३० किमी डांबरीकरण तर ७०० मीटर सिमेंट काँक्रिटचा भाग आहे. सदरील कामाचे कंत्राट हे राणा कन्स्ट्रक्शन जालना यांच्याकडे आहे. गेल्या ८ दिवसांपासून सुरू झालेल्या या कामाबद्दल नागरिकांना सुरुवातीपासून नाराजी होती. कामाच्या गुणवत्तेवर देखील नागरिकांची नाराजी होती. पण, रस्ता बनतोय त्यामुळे आता प्रवाशांचे हाल थांबतील या हेतूने कुणी सुरुवातीला बोलले नाही.
पण, जसजसे काम पुढे सरकू लागले लोकांना कामातील बनावटपणा जाणवू लागला. काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला डांबर खाली दबलेली पॉलीथिनची पन्नी दिसल्याने त्यांनी ती पन्नी ओढून पाहिली असता डांबराचा थर सरळ एखाद्या चटई सारखा निघाल्याने लोक संतापले.
कामामध्ये बनवाबनवी होत आहे हे लक्षात येताच काहींनी भर रस्त्यात डांबरचा थर खोदून काढल्याने त्या खाली पन्नी दिसली आणि लोकांनी याचा व्हिडिओ तयार करून व्हायरल करत पंतप्रधान सडक योजनेत कंत्राटदार कसे बनावट काम करत आहे याचा पर्दाफाश केला.