नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आसलेल्या उत्राणे येथील विवाह झालेल्या तरुणाची बुलढाणा जिल्ह्यातील लग्न जमविणाऱ्या टोळीने सुमारे अडीच लाख रुपयांना फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तरुणाने लग्न झालेल्या ‘पत्नी’ला थेट पोलिसांच्या स्वाधीन केले. या नववधू आणि संशयितांविरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील तरुण कामानिमित्त आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. त्या ठिकाणी विवाहाचा विषय निघाल्यानंतर विजय मुळे नामक लग्न जमवणाऱ्या मध्यस्थी व्यक्तीने मुलीचे आई-वडील गरीब असून 2 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याने अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यानुसार दोन लाख रुपये रोख आणि पन्नास हजार रुपये विजय मुळे यांच्या फोन पे वरून दिले अडीच लाखांची रक्कम मिळाल्यानंतर २५ मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे बागलाण तालुक्यातील प्रवीण याचा विवाह अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के हिच्याशी लावण्यात आला.
लग्नानंतर नववधूने लगेचच आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली, तसेच मधुचंद्रासाठी देखील नकार दिला यावेळी प्रवीणला संशय आल्याने नववधूकडे विश्वासात घेऊन विचारणा केली त्यावेळी तिने तिने संपूर्ण हकिगत सांगितली.
यापूर्वी बागलाण तालुक्यातील श्रीपूरवडे येथील हृषीकेश आणि साक्री तालुक्यातील काळगाव येथील चंद्रकांत यांच्याशी आपला विवाह झाल्याचे तरुणींने सांगितले हे ऐकल्यानंतर प्रवीणला धक्का बसला. विवाह झाल्यावर दोनच दिवसात दागिने घेऊन जात असल्याचे तिने प्रवीणला सांगितले.
त्यानंतर थेट प्रवीण यांनी तरुणीला पोलिसांच्या स्वाधीन केले. आतापर्यंत या टोळीने 15 ते वीस बनावट लग्न लावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी प्रवीण यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजय रामभाऊ मुळे, पूजाचे वडील असल्याची बतावणी करणारा एक अनोळखी इसम, अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.