देशातील कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीचा देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. पण क्रीडा क्षेत्रातील ज्या सन्माननीय व्यक्तींनी महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर बोलण्याची गरज आहे, त्यांनी आणखी ब्र देखील काढला नाहीये. अशावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकरने आंदोलनावर भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सचिनच्या मुंबईतील घरासमोर फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीकडून सचिनचा समाचार
मत विरहित भारतरत्न सचिन तेंडुलकरजी भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का? कारण किसान आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूला तुम्ही सणसणीत उत्तर दिलं होतं. आमच्या देशांतर्गत प्रश्नात तू नाक खुपसू नकोस, असं सुनावलं होतं. आज मात्र सचिन तुझे तेच देश प्रेम कुठे गेले आहे? अशी विचारणा युवक काँग्रेसचे प्रवक्ते रंजीता गोरे यांनी केली आहे. त्याचवेळी सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीच्या धाडींची तुला भीती वाटतीये का? तू कुठल्यातरी दबावाखाली आहेस का? असा खोचक प्रश्नही त्यांनी सचिनला विचारला आहे.
क्रीडा विश्वातील तुम्ही देव माणूस आहात. एक भारतरत्न देखील आहात मात्र जेव्हा क्रीडा विश्वातील काही महिला लैंगिक अत्याचार विरोधात आवाज उठवत आहेत. तेव्हा मात्र आम्हाला तुमच्यातील माणूस आणि तुमच्यातील माणुसकी कोठेही दिसून येत नाही, अशी खंतही रंजीता गोरे यांनी व्यक्त केलीये.
तू मुलींची बाजू घेशील अन् त्यांचाही स्माईल अम्बेसिडर बनशील…!
क्लाईड क्रास्टो म्हणतात, प्रिय सचिन- भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ मुख अभियानासाठी स्माईल अम्बेसिडर म्हणून तुमची नियुक्ती झाली. मात्र तुला माहिती आहे का भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्या कुस्तीपटूंचे हास्य हिरावून घेतलंय. कुस्तीपटू न्यायासाठी लढतायेत. मात्र खासदाराला वाचवण्यासाठी भाजपने डोळे मिटून घेतलेत’
“भारतीय महिला कुस्तीपटू तुझ्यासारखेच आपल्या देशाच्या गौरव आहेत. एक खेळाडू म्हणून तू त्यांना समर्थन देणे हे तुझे कर्तव्य आहे. आशा आहे की तू बोलशील आणि त्यांचाही स्माईल अम्बेसिडर बनशील”