• Sat. Sep 21st, 2024
Dombivli News: कुत्रा तलावाकडे पाहून सतत भुंकत होता, लोकांना अशुभ घडल्याची जाणीव झाली अन्…

डोंबिवली: डोंबिवलीच्या दावडी परिसरात असणाऱ्या एका तलावात बुडून भावा-बहिणीचा करुण अंत झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. रंजीत रवींद्रन (वय २२) आणि किर्ती रवींद्रन (वय १६) अशी या भावाबहिणीचे नाव होते. रंजीत आणि किर्ती हे दोघे दर रविवारी आपल्या घरातील कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी तलावावर येत असत. मात्र, रविवारची दुपार या दोघांसाठी जीवघेणी ठरली. रंजीत आणि किर्ती या दोघांनाही तलावातील पाण्याचा नेमका अंदाज आला नाही आणि या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या तलावाचा परिसर काहीसा निर्जन आहे. त्यामुळे रंजीत आणि किर्ती हे दोघेही तलावात बुडाल्यानंतरही बराचवेळ ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, रंजीत आणि किर्ती यांच्यासोबत आलेला कुत्रा त्याठिकाणीच थांबून भुंकत राहिला. त्यामुळेच या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला.

Pune News: वाघोलीत प्रेयसीकडून भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकराची निर्घृण हत्या, पुणे हादरलं

या घटनेमुळे किर्ती आणि रंजीत राहत असलेल्या गुरु साईचरण बिल्डिंगच्या रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. रंजीत आणि किर्ती यांचे आईवडील केरळला त्यांच्या गावी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. रंजीत आणि किर्ती दर रविवारी या तलावावर यायचे. मात्र, २८ मे रोजी हे दोघेही तलावातील आणखी खोल पाण्यात शिरले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवारी सकाळी उशीरा रंजीत आणि किर्ती तलावापाशी आले असावेत. त्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांचा कुत्रा तलावाकडे पाहून सतत भुंकत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. नागरिकांना कुत्र्याचे हे वागणे विचित्र वाटले, त्यामुळे काहीजण त्याठिकाणी गेले. तेव्हा तलावापासून काही अंतरावर एक स्कुटर पार्क केल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे याठिकाणी काहीतरी अघटित घडले असावे, असा संशय लोकांना आला. शंकेची पाल चुकचुकताच लोकांना तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. साधारण साडेबाराच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात शिरून शोधाशोध सुरु केली. साधारण दीड तासाने रंजीत आणि किर्ती यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. या दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसावा. त्यामुळे हे दोघेही तलावात बुडाले असावेत, असा अंदाज अग्निशमन दलाचे अधिकारी यशवंत घंगाळे यांनी व्यक्त केला.

आयव्हीएफ ट्रीटमेंट सुरु असणाऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये नवऱ्याने बायकोला संपवलं

किर्ती आणि रंजीत या दोघांच्या मृत्यूच्या बातमीने ते राहत असलेल्या उमेश नगर परिसरातील इमारतीमधील रहिवाशांना मोठा धक्का बसला. रंजीत आणि किर्ती यांचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. तर आई घरी ट्युशन घेते. रंजीतने नुकतेच एमबीबीएस पूर्ण करुन एका रुग्णालयात इंटर्नशीप सुरु केली होती. तर किर्ती ही बारावीला होती. या दोघांचे आईवडील केरळला त्यांच्या गावी गेले होते. दोघांच्या मृत्यूचा धक्का पालकांना सहन होणार नाही, त्यामुळे या दोघांना या घटनेची कल्पना देण्यात आली नव्हती. इमारतीमधील रहिवाशांनी या दोघांचे मृतदेह त्यांच्या केरळमधील गावी न्यायचे ठरवले असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed