सॅम डिसुझा याने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये सॅम डिसोझाने म्हटले आहे की, आर्यन खान प्रकरणात त्याच्यावर जबाब बदलण्यासाठी दबाव आणला जात आहे. एवढेच नव्हे तर आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांची चौकशी करणाऱ्या ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील एनसीबीच्या विशेष तपास पथकावरही सॅम डिसुझा याने गंभीर आरोप केले आहेत. बॉलीवूड किंग शाहरुख खान ७ नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्लीत एनसीबीच्या विशेष तपास पथकाच्या कार्यालयात गेला होता. त्यावेळी शाहरुख खान आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर माझ्यावर समीर वानखेडे यांना फसवण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असा गंभीर आरोप सॅम डिसोझा याने केला.
एनसीबीच्या एसआयटीच्या कार्यालयात शाहरुख खान आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या भेटीचा साक्षीदार माझा मित्र आहे. त्यानंतर समीर वानखेडे यांना २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोपाखाली फसवण्यासाठी कट आखण्यात आला. एवढेच नव्हे तर आर्यन खान प्रकरणातून माझे नाव हटवण्यासाठी एनसीबीचे तत्कालीन उपविभागीय संचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी माझ्याकडे १५ लाखांची लाच मागितली होती, असा आरोप सॅम याने केला.
दरम्यान, सॅम डिसोझा यानेही अटकेच्या कारवाईपासून संरक्षण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र, न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यामुळे आता सॅम डिसोझा अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेऊ शकतो. सॅम डिसोझा यानेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीबाबत माहिती दिली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली एनसीबीने केलेल्या कारवाईत आर्यन खानला पकडण्यात आले होते.