महाविकास आघाडीमध्ये नैसर्गिक हक्कानुसार या जागेवर शिवसेना निवडून आल्याने त्या जागा आम्हालाच हव्यात असे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने संभाव्य उमेदवार म्ह्णून संजय घाटगे, संजय पवार व मुरलीधर जाधव यांची नावे पुढे आणली आहेत. पण दोन्ही खासदार भाजपसोबत गेल्याने आता तुमचा हक्कही आपोआप हिरावला गेला आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोर लावला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून या दोन्ही जागा त्यांच्याकडे आहेत. केवळ ताकदीचा उमेदवार नव्हता, म्ह्णून त्यांनी हातकणंगले मतदारसंघ एकदा काँग्रेसला तर दुसऱ्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला. सध्या तरी या पक्षाकडे दोन्हीकडे ताकदीचा उमेदवार नाही. तरीही आमदार हसन मुश्रीफ, व्ही.बी.पाटील, के.पी. पाटील, चेतन नरके हे कोल्हापुरातून तर प्रतिक जयंत पाटील यांचे नाव हातकणंगलेतून पुढे केले जात आहे.
महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाची ताकद जिल्ह्यात अतिशय चांगली आहे. सहा आमदार असल्याने या ताकदीच्या जोरावर कोल्हापूरची जागा आम्हाला द्यावी अशी मागणी सतत केली जात आहे. त्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार पी.एन. पाटील, बाजीराव खाडे अशी नावे पुढे केली जात आहेत. ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर करत सहा जागा लढवण्याची घोषणा करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी दोन जागा घेऊन सोबत येतील अशी आशा महाविकास आघाडीला आहे. त्या दृष्टीने ते हातकणंगलेवर हक्क सांगतानाच बुलढाणा अथवा सांगलीची दुसरी जागा मागतील अशी अपेक्षा आहे.
या सर्व पार्श्वभूमीर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघावर सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, ठाकरेंची शिवसेना या सर्वच पक्षांनी दावा केला आहे. प्रत्येकाने हा आपल्याच हक्काचा मतदारसंघ असल्याचे सांगत संभाव्य उमेदवार म्ह्णून नावे पुढे करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे हे मतदारसंघ नेमक्या कोणत्या पक्षाला मिळणार, उमेदवार कोण असणार याची उत्सुकता वाढणार आहे.