वाशी सेक्टर ९मध्ये फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून सायंकाळी येथून चालणे मुश्कील होते. एपीएमसीजवळील पदपथांचीही परिस्थिती अशीच आहे. माथाडी भवन परिसरामध्ये दुकानदारांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. मसाला बाजाराजवळील सेवा रस्त्यावर पदपथावर भाजी व फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. कोपरी गाव येथे पदपथावर वाहने उभी केली जात आहेत. ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात पदपथावर रिक्षाचालकांनी अनधिकृतपणे रिक्षा स्टँड उभारले आहे.
पदपथावर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणासंदर्भात आढावा घेतला जाईल, त्यानुसार अतिक्रमण केले असल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– सोमनाथ पोटरे, उपायुक्त, अतिक्रमणविरोधी विभाग
नेरूळ रेल्वे स्थानकासमोर सायंकाळी पूर्ण पदपथ भाजी व मासे विक्रेत्यांनी व्यापलेला असतो. नेरूळ सेक्टर २०मध्ये गॅरेज, हॉटेल व्यावसायिक तसेच मटणविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. तुर्भे नाका येथे मटण विक्रेत्यांनी पूर्ण पदपथ गिळंकृत केला आहे. कोपरी येथे कार व्यावसायिकांनी पदपथावर कब्जा केला आहे. रबाळे रेल्वे स्थानकासमोरील भुयारी मार्गाजवळ पदपथावर फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. ठाणे- बेलापूर मार्गावरील तुर्भे नाक्यावर पदपथावर फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे.
पदपथावर फेरीवाले बसत असल्यामुळे व रस्त्याकडेला वाहने लावण्यात येत असल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षित जागाच उरलेली नाही. त्यामुळे चालणे कठीण होत आहे. पदपथ फेरीवाल्यांनी व्यापल्याने पादचाऱ्यांना नाईलाजास्तव रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे साखळीचोरीचे प्रकार वारंवार घडत असल्याचे स्थानिक प्राजक्ता काळे यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींचाच आशीर्वाद
लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादानेचे काही ठिकाणी पदपथावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. पदपथावर बसलेल्या या फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई केली, तरी लोकप्रतिनिधी तसेच राजकीय नेते हे फेरीवाल्यांचे जप्त केलेले सामान पुन्हा देण्यासाठी पालिकेच्या आधिकाऱ्यांवर दबाव टाकतात. पदपथावरील फेरीवाल्यासंदर्भात पालिकेत अनेकदा नगरसेवक आवाज उठवत असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्याच आशीर्वादाने पदपथांवर फेरीवाल्यांनी कब्जा केलेला दिसून येतो.