आसाम येथे बदलीच्या ठिकाणी जाणाऱ्या सैन्यदलाच्या गाडीचे मागचे फाटक तुटल्याने लोण खुर्द येथील सीमा सुरक्षा दलात कार्यरत लीलाधर शिंदे शहीद झाले. ही घटना १६ मे रोजी आसाम येथे घडली होती. त्यांचे पार्थिव शुक्रवारी १९ रोजी दुपारी १२.३० वाजता लोण येथे आल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी शहिद जवान अमर रहे, लीलाधर शिंदे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.
शिंदे यांचे पार्थीव मूळ गावी नेत असताना वाटेतील चाळीसगाव, पारोळा, अमळनेर आदी तालुक्यांच्या ठिकाणी शहीद लीलाधर शिंदे यांना मानवंदना देण्यात आली. या वेळी अंतिम निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. पार्थिव गावात पोहोचताच अनेकांनी शोक, सद्भावना व्यक्त केल्या. गावात सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
तसेच देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. शहर तसेच ग्रामीण भागात लीलाधर शिंदे यांच्या श्रद्धांजलीचे बॅनर लागले होते. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी लोण येथील घरी पोहोचल्यानंतर गावातून एक किलोमीटर लांबीची तिरंगा यात्रा काढून त्यांना मानवंदना दिली गेली. त्यानंतर सैन्यदलाच्या ताफ्यातील सजावट केलेल्या वाहनातून वीर जवान लीलाधर शिंदे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अमरधाम येथे मुलाच्या हस्ते त्यांना मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते. कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. कर्तव्यावर असताना वीर मरण आलेल्या लीलाधर यांना साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.