मनोज यादव हे भारतीय जनता पक्षात चिटणीस पदी तर संदीप छपरवार हे जिल्हा उपाध्यक्ष पदी कार्यरत होते. वर्ष २००८ साली शासकीय वाहनांची तोडफोड आणि दगडफेक प्रकरणी नांदेड न्यायालयाने काही दिवसा पूर्वी शिवसेनेच्या माजी आमदार अनुसया खेडकर यांच्या सह १९ जणांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. तसेच प्रत्येकांना १ लाख ६० हजार रुपयाचा दंड देखील ठोठावला होता. शिक्षा सुनावण्यात आलेल्या मध्ये शिवसेना सोडून भाजपात गेलेले मनोज यादव, संदीप छप्परवार आणि दिलीप ठाकूर यांचा देखील समावेश होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कार्यकर्त्या समोर दंडाची रक्कम भरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. भाजप कार्यकर्त्यांसह ठाकरे गटातील अनेकांची पैसे भरण्याची परिस्थिती नव्हती. ही बाब समजल्या नंतर उद्धव ठाकरे यांनी मदतीचे आश्वासन दिले होते.
अखेर मातोश्री मधून आलेल्या आदेशानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी तात्काळ सर्वांचे पैसे भरले. शिवसेनेच्या मदतीमुळे सर्वांना जामीन मिळाला. कोण कोणत्या पक्षात आहे याचा विचार न करता ठाकरे गटाच्या शिवसेनेने संकट काळी मदतीचा हाथ दिला होता. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांची पक्षाकडून कुठलीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे भाजपचे मनोज यादव आणि संदीप छप्परवार नाराज होते. याच नाराजीतून आणि संकट काळात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने साथ दिल्याने या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी भाजपा सोडचिठ्ठी देत बुधवारी सेनेत प्रवेश केला.पक्षा सोबत एकनिष्ठ राहण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
दोन्ही पदाधिकारी पूर्वी शिवसेनेत होते. शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला होता. तब्बल पाच वर्ष भाजपात होते. आता मात्र ठाकरे गटाकडून संकट काळी मिळालेल्या मदतीने मुळे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांची घरवापसी झाली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.