दरम्यान दुसऱ्या दिवशी दुपारी तपोवन देवी मंदिराच्या पाठीमागील डोंगराळ भागात बालिकेचा मृतदेहच सापडला. मृतदेहावर दगडाची पाळ रचलेली होती. रुमालाने गळा आवळून तिचा खून झाल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्हाभरात एकच खळबळ उडाली. तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
तपासाला दिशा मिळावी यासाठी सीसीटीव्हीचा आधार मिळेल असे वाटत होते. मात्र त्यात यश आले नाही. हे कृत्य ओळखीतल्या व्यक्तीने केले की अनोळखीने? यात कुटुंबातील व्यक्तीचा सहभाग तर नाही ना? असाही संशय पोलिसांना होता. त्यादृष्टीनेदेखील पोलिसांची तपासचक्रे फिरत होती.
दरम्यान शवविच्छेदन करतेवेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आल्याने पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी त्यादृष्टीने अनेक जणांची चौकशी केली. परिसरातील अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मंदिर परिसरात नारळ व पूजेच्या साहित्याची विक्री करणाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी पूजेच्या साहित्याचे दुकान असलेल्या सदानंद भगवान रोडगे या तरुणावर पोलिसांचा संशय बळावला होता.
तपोवन देवी परिसरात सदानंद प्रसाद व पूजेचे साहित्य विकायचा व्यवसाय करतो. महत्त्वाचे म्हणजे खून केल्यानंतर सदानंदाने आपला व्यवसाय सुरूच ठेवला. घटना झाल्यापासून तर घटनेचा उलगडा होईपर्यंत सदानंद त्याच परिसरात पोलिसांसमोरच आपला नित्यनेमाने व्यवसाय करत होता. आधी सदानंदने बालिकेवर अत्याचार केला. नंतर बोंब होऊ नये म्हणून त्याने गळा आवळून तिचा खून केल्याचे समोर आले.
गालावर नखाचे व्रण दिसल्याने खूनाचा उलगडा
लग्न समारंभासाठी आलेल्या बालिकेला या भागात कोणी परिचयाचे नव्हते. तिचे बेपत्ता होणे आणि दुसऱ्या दिवशी दगडाची पाळ रचून त्याखाली झाकलेला मृतदेह सापडणे; यामुळे समाजमन हळहळले होते. चिखलीकरांनी एक दिवस बंद पाळला. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या शिताफिने हा तपास पूर्ण केला. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर सदानंदला पोलिसांनी ताब्यात घेतले.
गालावर नख लागल्यासारख्या व्रणामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. मात्र सुरुवातीला दाढी करताना ब्लेड लागल्याचे सदानंदने पोलिसांना सांगितले. मात्र प्रसाद विकणाऱ्या सदानंदला पोलिसांनी ‘खाकीचा प्रसाद’ दिल्यानंतर त्याने हकिकत कथन केली. सहा दिवसांत पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे, ठाणेदार गणेश हिवरकर व तपास पथकांनी यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. सदानंदला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाइल तपासकामी सायबर सेलकडे पाठवला आहे. यात पॉर्न पाहण्याची सवय त्याला असल्याचा संशय पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे. मात्र सायबर विभागाच्या निष्कर्षातूनच यातील सत्यता स्पष्ट होईल.
फाशीची मागणी
दिवसेंदिवस समाजातील विकृती कळस गाठत आहे. सहा वर्षीय राधिका इंगळेच्या खून प्रकरणात आरोपी सदानंद रोडगे याने माणुसकीला काळीमा फासली आहे. जलद गती न्यायालयात तातडीने हे प्रकरण चालवून अशा आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी समाजमनातून होत आहे.