पीडित महिला विवाहित असून पतीसोबत वाद सुरु असल्यामुळे ती मैत्रीण ज्योती सोनकर हिच्यासोबत दिवा पूर्व आगासन रोड येथील पाटील टॉवर रुम नंबर ५११ मध्ये २ महिन्यांपासून राहत होती. मात्र १५ मे रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास किरण खंदारे हिचा पती नागेश बाळू रुपवते हा ज्योती सोनकर हिच्या घरी आला. आणि त्याने किरणला आपल्यासोबत नांदण्यास का येत नाही? या कारणावरून वाद सुरु केला.
हे भांडण एवढे विकोपाला गेले की आरोपी पती नागेश आपल्याजवळ असलेल्या चाकूने किरण यांच्या गळ्यावर, पोटावर, आणि दोन्ही हाता-पायावर वार करू लागला. हा सगळा प्रकार घडलेला पाहून किरण यांची मैत्रीण ज्योती सोनकर हिने मध्यस्थी करत किरणला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नागेशने ज्योतीवर देखील वार करण्यास सुरुवात केली. त्याने ज्योतीच्या गळ्यावर आणि पोटावर चाकू भोसकून तिला देखील गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पोबारा केला.
सदर प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळताच घडलेली घटना पोलीस अंमलदार देसले यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांना सांगितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हटकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित पथक घटनास्थळी रवाना केले. पथकाने दोन्ही जखमींना ऍम्ब्युलंसच्या सहाय्याने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. त्यावेळी डॉक्तरांनी ज्योती सोनकर हिला मृत घोषित केले.
मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर तयार केलेले पथकाने कसोशीने तपस करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आणि अवघ्या २ तासात त्यांनी आरोपी पती नागेश बाळू रुपवते याला बेड्या ठोकून जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी पती नागेशला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.