विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावरील निर्णय देताना सांगितले होते. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी विधानभवनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार अपात्रतेबाबत आपले म्हणणे मांडले. न्यायालयाकडून संविधानिक शिस्त कायम ठेवत हा निर्णय विधिमंडळाकडे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, मात्र कोणतीही घाई केली जाणार नाही. सर्व मुद्दे लक्षात घेऊन आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेतला जाईल. माझ्याकडे ५४ आमदारांच्या पाच याचिका आहेत. जुलै २०२२मध्ये पक्ष कोणता होता हे आधी ठरवावे लागणार आहे. त्या आधारावर निर्णय घेतला जाईल. हे करत असताना शिवसेनेच्या घटनेचाही अभ्यास केला जाणार आहे. पक्ष घटनेनुसार चालतो का हेदेखील पाहिले जाईल’, असे नार्वेकर म्हणाले.
ठाकरे गटाकडून कोणतेही निवेदन नाही
दरम्यान, सोमवारी ठाकरे गटाने विधासभा उपाध्यक्षांची भेट घेतली होती. अध्यक्ष विदेश दौऱ्यावर असल्याने आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आपण निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने उपाध्यक्षांकडे केली होती. याबाबत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, ‘अद्याप या संदर्भात ठाकरे गटाचे कोणतेही निवेदन माझ्याकडे आलेले नाही.’
सर्वोच्च न्यायालयाकडून सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विदेश दौऱ्यावर होते. भारतात दाखल झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. आता ते कधी निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.