जामखेड बाजार समितीचे उपसभापतीपद आमच्याकडेच येईल असा विश्वास होता. मात्र, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधात काम केले, असा आरोप आमदार राम शिंदे यांनी केला आहे. एवढचं नव्हे तर या गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घातल्या आहेत. आणि याचा अवाहल वरिष्ठांना दिला जाईल. विधानसभेतही विखेंनी विरोधात काम केलं होतं. आताही विरोधात काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि सुजय विखेंमध्ये छुपी युती असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला आहे. आमचा पक्ष भाजप आहे, काँग्रेस नाही, असा टोलाही त्यांनी विखे पाटील यांना लगावला आहे.
स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या आमच्या उमेदवारा उपसभापतीपदाच्या निवडीत पराभव झाला. पण तांत्रिकदृष्ट्या ही बाजार समिती भाजपच्या स्वाभिमानी विकास पॅनलच्या ताब्यात आली आहे. आमचा सभापती झालाय, आमचा झेंडा लागलाय. पण यामध्ये खासदारांचं आणि पालकमंत्र्यांचं सहकार्य अपेक्षित होतं आणि ते मिळालं नाही. त्यांचे एक पीए आणि त्यांचे बंधू यांनी आमच्या विरोधा फॉर्म भरला. एका कार्यकर्ताही होता तो विरोधात गेला. आम्हाला सहकार्य करतो म्हणून सांगितलं. पण पहिल्या दिवसापासून आच्या भूमिकेला विरोध करण्याची भूमिका त्यांनी पार पाडली, असा आरोप राम शिंदे यांनी विखे पाटील पिता पुत्रांवर केला आहे.
भाजपने, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीने ही निवडणूक लढली. आणि पवारांच्या विरोधात ही निवडणूक लढली. जिल्हा बँकेच्या संचालकाविरोधात लढली. आमच्याच पक्षाच्या खासदाराविरोधात लढली आणि लोकांनी आम्हाला कौल दिला. भाजपने आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, पालकमंत्री केलं आणि या राज्याच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचं स्थान म्हणजे महसूल मंत्रीही केलं. आणखी काय हवं आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. कार्यकर्त्याच्या निवडणुकीत नेतृत्वाने अशा प्रकारे व्यवहार करणं हे गैर आहे. मी हा विषय नेतृत्वाच्या आणि पक्षाच्या कानावर हा विषय घातलेला आहे. आणि पुन्हा एकदा माहिती देणार आहे. सातत्याने अशा प्रकारे कार्यकर्त्यांना अडचणी येत असतील तर हे गंभीर आहे. यामुळे भविष्यात पक्षाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. शेवटी एकदा कटुता निर्माण झाल्यानंतर ती वाढत जाते. भाजप हा पार्टी विथ द डिफरन्स आहे, काँग्रेस नाही. यामुळे भाजपमध्ये अशा वर्तनाला स्थान नाही, असं म्हणत राम शिंदे यांनी विखे पाटील यांना दिला आहे.
यानिमित्ताने विखे पाटील आणि रोहित पवार यांनी आम्ही एक आहोत हे दाखवून दिलं आहे. कारण रोहित पवार आणि सुजय विखे यांच्या एकत्रित पॅनेलचेच हे उमेदवार होते. तरीही आम्ही दीड महिना यावर कुठेही भाष्य केलं नाही. शेवटच्या क्षणी आम्ही सत्तेत आहोत. हे (विखे पाटील) ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या विरोधात काम करतात, अनेक लोकं सांगात. याचा प्रत्यय मलाही आला, असं म्हणत राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला.
जामखेडमध्ये काय झालं?
जामखेड बाजार समितीच्या १८ जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे लक्ष लागले होते. कोणाचा सभापती होणार? याकडे लक्ष लागले होते. पदाधिकाऱ्यांची आज निवड झाली. सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि त्यांची निवड घोषित करण्यात आली. तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे कैलास वराट यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि ते निवडले गेले. समान मते मिळाल्याने लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून निवड करण्यात आली. सभापतीपदाच्या निवडीत ईश्वरी चिठ्ठी टाकून हा कौल घेण्यात आला. अंकुश ढवळे आणि कैलास वराट हे दोन उमेदवार हे सुजय विखे यांचे उमेदवार असून ते बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या गटातून निवडणूक लढवून निवडून आले होते. त्यातील एक उमेदवार उपसभापती विराजमान झाला आहे.