बुलढाणा जिल्ह्यातील कोथळी या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या लेकीचा शाही विवाह केला. या विवाहाची खास बाब म्हणजे लग्नासाठी परिसरात असणाऱ्या पशु-पक्षांसाठीही जेवणाची पंगत होती. परिसरातील पाच गावातील दहा हजार लोकांना लग्नासाठी आणि जेवणासाठी निमंत्रणही देण्यात आलं होत.
कोथळी गावातील प्रकाश सरोदे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या एकुलत्या एका लेकीचा विवाह सोहळा. या विवाह सोहळ्यासाठी गावालगत पाच एकर शेतात मंडप घालण्यात आला होता. कोथळी गावाजवळील इतर पाच गावातील लोकांना या विवाहाचं निमंत्रण देण्यात आलं आणि जवळपास दहा हजार लोकांसाठी इथे जेवणावळी झाल्या.
इतकंच नाही, तर सरोदे यांनी परिसरातील गुरं, पशू-पक्ष्यांसाठी जेवणाची सोय केली होती. यासाठी गायींना दहा क्विंटल ढेप, गुरांना दहा ट्रॉली सुखा चारा, परिसरातील श्वानांनाही जेवणाची सोय होती. इतकंच काय तर परिसरातील मुंग्याही उपाशी राहू नये म्हणून मुंग्यांना दोन पोती साखर टाकण्यात आली होती. या शाही विवाह सोहळ्यात कुणीही उपाशी राहू नये म्हणून काळजी घेण्यात आली.
प्रकाश सरोदे यांनी आपल्या लाडक्या लेकीचा विवाह भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या अतुल दिवाणे याच्याशी केला. अल्पभूधारक असूनही नातेवाईकांच्या मदतीने हा विवाह सोहळा म्हणजे परिसरातील सर्वांसाठी नेत्रदीपक ठरला. या सोहळ्यात मुक्या प्रण्यांचीही काळजी घेण्यात आली.
सर्वप्रथम गायीचं पूजन करून परिसरात असणाऱ्या सर्व गायींना ढेप खाऊ घालण्यात आली. त्यानंतर इतर सर्वांच्या गुरांना चारा, परिसरातील पक्षांना तांदूळ, श्वानांना जेवण देण्यात आलं, तर आपल्या कन्येच्या विवाहात मुंग्यांही उपाशी राहू नये म्हणून दोन क्विंटल साखर परिसरातील मुंग्यांना टाकण्यात आली. या अनोख्या लग्नाची जिल्ह्यात सर्वत्र एकच चर्चा होत आहे.