• Sat. Sep 21st, 2024
शिंदे-फडणवीस सरकारही भाकरी फिरवणार; मंत्रालयात लवकरच बदल्यांचा धडाका

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारतर्फे काही दिवसांपूर्वीच पोलिस दलात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लवकरच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील बदल्या जाहीर केल्यानंतर लवकरच जवळपास २० ते २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.शिंदे-फडणवीस सरकारतर्फे काही दिवसांपूर्वीच गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि बदल्यांचा जम्बो निर्णय जाहीर करण्यात आला होता. यात पोलिस महासंचालक श्रेणीतील अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यात प्रामुख्याने सदानंद दाते, बिपीनकुमार सिंह, अभिवन देशमुख, कृष्णप्रकाश यांच्यासारख्या अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. यानंतर मंत्रालयातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची बदली अर्थ खात्यात करण्यात आली. तर तुकाराम मुंढे यांच्यावर कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. आता लवकरच राज्यात आणखी काही बदल्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली.

सत्तासंघर्षाच्या निकालाला काहीच दिवस, CM एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात!

२० अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवडाभरात केल्या जाणार आहेत. विविध टप्प्यांत या बदल्या जाहीर केल्या जातील. या बदल्यांमध्ये मंत्रालयाव्यतिरिक्त इतरही काही बदल्या केल्या जातील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याशिवाय पोलिस दलात महत्त्वपूर्ण फेरबदलही केले जातील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहेत. दरम्यान, महसूल विभागासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गृहनिर्माण विभागात या बदल्या होतील, अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed