यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवार यांची भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य फुटीविषयी विचारणा करण्यात आली. अजित पवार यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचे आहे, ते त्यांच्या राजकारणाचे अंतिम ध्येय आहे, असे’सामना’त म्हटले आहे. यावर तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील यांनी तोलूनमापून बोलत सावध प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, देश आणि राज्य पातळीवर काम करणाऱ्या प्रत्येक नेत्याला मोठं पद हवं असतं. प्रत्येक नेत्याची तशी महत्वाकांक्षा असते, किंबहूना ती का असू नये? राजकीय कारकीर्दीत एखादं मोठं पद मिळत असेल तर ती संधी कोणीही सोडणार नाही. त्यामुळे त्याचा विरोध होता कामा नये. तसा विरोध होत असला तरी तो राजकीय स्वरुपाचा आहे. मुळात राजकीय महत्वाकांक्षा नसेल तर जगण्याचा उद्देशच उरत नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
पक्षातील फूट टाळण्यासाठी शरद पवारांनी राजीनामा दिला का; ‘सामना’च्या अग्रलेखातील सवाल
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असावा, अशी शंका ‘सामना’तून व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे व राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला. पक्षातील ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय? शिवसेना फुटली. चाळीस आमदार सोडून गेले, पण संघटन व पक्ष जागेवरच आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले तरी जिल्हा स्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी, यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो, अशी शक्यता ‘सामना’तून वर्तविण्यात आली आहे.
घोषणा पवारांच्या राजीनाम्याची, अन् चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या संघर्षाची!