कर्नाटकातून सातारा मार्गे पुण्यात जाणार होते पण…
या ३ संशयित आरोपींकडे अधिक तपास केला असता हा सर्व मुद्देमाल सोलापुरातील अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रशांत शशिकांत कुचेकर(रा सोलापूर) यांचा असल्याचे कबुली जबाबात दिले. तसेच पंकज दत्तात्रय तुरेकर, दर्शन दत्तात्रय तुरेकर(दोघे रा हडपसर पुणे),रोहित पटाले(रा इंदापूर,जि पुणे) यांचा देखील असल्याची माहिती समोर आली आहे. यांच्या सांगण्यावरून हा गुटखा व सुगंधित तंबाकू कर्नाटकातून सातारा मार्गे पुणे जिल्ह्यात घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
यावरून कवठेमहाकाळ पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत कुचेकर हे सोलापुरातील अन्न व औषध कार्यालयात निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. गुटखा प्रतिबंधक कार्यालयात काम करणारा अधिकारी गुटखा किंग असल्याची माहिती समोर आल्याने सोलापुरात मोठी चर्चा सुरू आहे.
२ कंटेनरमधून १ कोटी १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत…
सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांना खबऱ्या मार्फत या मार्गावरून गुटख्याचा कंटेनर जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, यांच्यासह सांगली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पोलीस पथकाने सापळा रचला. विजापूर येथून जतमार्गे या महामार्गावर २ कंटेनर जात असताना सापळा रचलेल्या पथकातील सर्वांनी कंटेनर अडवले. पोलीसी खाक्या दाखवताच यामध्ये एका कंपनीचा गुटखा आहे, तो पुण्याकडे वाहतूक करत असल्याचे संशयित आरोपींनी सांगितले.
सांगली पोलिसांनी कंटेनर चालवणाऱ्या चालकांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली. हा गुटखा व सुगंधित तंबाकू कुठून आणली, कुणाचा माल आहे, कुठे घेऊन जात आहात? यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या अन्न व औषध पप्रतिबंधक कार्यालयात निरीक्षक पदावर कार्यरत असलेले प्रशांत कुचेकर यांचा माल असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सोलापुरातील अन्न व औषध कार्यालयातील सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांना अधिक माहिती विचारली असता त्यांनी दुजोरा दिला आहे. यामध्ये संशयित आरोपींनी अधिकाऱ्यांना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहितीही समोर आली आहे.