यूपीएच्या किमान समान कार्यक्रमाच्या जाहीरनाम्यात त्यांनी वन रूपी क्लिनिकचं आश्वासन दिलं होतं. पण अडीच वर्षात ते एकही क्लिनिक ते सुरू करू शकले नाहीत. राज्यात साडेतीनशे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही सुरू केले. त्यामुळे हे फक्त टीका करणारे लोक आहेत. तोंडाची वाफ दवडणारे लोक आहेत. जनतेबद्दल यांना काही देणंघेणं नाही, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
उद्धव ठाकरे ६ तारखेला बारसूला जाणार आहेत. दुसरीके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही रत्नागिरी जिल्हा बंदी करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का? असा प्रश्न यावेळी पत्रकरांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला. आंदोलनाला मुळातच स्थानिकांचं समर्थन नाही. बाहेरून लोक नेवून आंदोलन करण्याचं काम चाललेलं आहे. स्थानिक अतिशय थोडे आहेत. त्यापेक्षा जास्त रिफायनरीला समर्थन देणारे लोक त्या ठिकाणी आहेत. तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पाहिजे, एखादा अनुचित प्रकार झाला पाहिजे, सरकारला बदनाम करता येईल, अशी कुठलीतरी घटना घडली पाहिजे, असा काही लोकांचा प्रयत्न आहे. सामान्य नागरिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय गोळी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यांनी काही केलं तरी जनतेला कळलेलं आहे, हे दुटप्पी आहेत ते. एकीकडे हेच पत्र पाठवतात, बारसूमध्ये रिफायनरी करण्यासाठी आणि तेच आंदोलनाला जातात, यामुळे यांचा दुहेरी चेहरा हा समोर आलेला आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
बारसूमध्ये काही लोकांना नेण्यात येत आहे, कोण आहेत ते? या प्रश्नावरही फडणवीस यांनी माहिती दिली. त्या लोकांची माहिती मिळाली आहे. काही नेतेही त्यात आहेत. राज्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा एक गट आहे. हा गटही बारसूमध्ये सक्रिय असल्याचं समोर येत आहे, अशी मोठी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.