म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईकरांची रविवारची सकाळ अंधारून आलेल्या आभाळाने उजाडली. आभाळाच्या बदललेल्या रंगामुळे हा पावसाळा आहे की उन्हाळा असा प्रश्न मुंबईकरांसमोर होता. गेल्या आठवड्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देऊन पाऊस न आल्याने मुंबईकर निवांत झाले होते. रविवारी सकाळी अल्पकाळामध्ये जोरदार सरींनी मुंबईच्या काही भागांमध्ये उपस्थिती लावली आणि त्यानंतर पुन्हा ऊन पडले होते. आज, सोमवारीही मुंबईत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.रविवारी मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची उपस्थिती होती. कुलाबा येथे रविवारी सकाळी १.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ येथे मात्र पाऊस नव्हता. स्वयंचलित यंत्रणेवर झालेल्या नोंदीनुसार सकाळी जेमतेम पाच मिलीमीटर पावसाची ठिकठिकाणी नोंद झाली. दहिसर अग्निशमन दल केंद्र येथे ९ मिलीमीटर, एफ उत्तर विभाग कार्यालय येथे ११.१८ मिलीमीटर, जी दक्षिण विभाग कार्यालय येथे १४.२२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. यातील काही केंद्रांवर सकाळी ८.३०च्या आधी पाऊस पडला. या पावसामुळे सकाळच्या वेळी हवेत किंचित गारवा पसरला मात्र त्यानंतर पुन्हा एकदा उकाड्याची जाणीव तीव्र झाली. कुलाबा येथे किमान तापमान २६, तर सांताक्रूझ येथे २५.६ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथे कमाल तापमान ३२.८, तर सांताक्रूझ येथे ३२.२ अंश सेल्सिअस होते. किमान तापमान सरासरीइतके असले तरी कमाल तापमान सरासरीपेक्षा कुलाबा येथे १ अंशाने, तर सांताक्रूझ येथे २ अंशाने उतरले होते.
राज्यात सर्वदूर पावसाच्या उपस्थितीमुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा खाली उतरले आहे. नांदेड येथे सरासरीपेक्षा १० अंशांनी, तर छत्रपती संभाजी नगर येथे सरासरीपेक्षा ७ अंशांनी कमाल तापमान कमी आहे. परभणी येथेही कमाल तापमान सरासरीपेक्षा १० अंशांनी कमी आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील कमाल तापमान हे सरासरीपेक्षा खूप कमी नाही. मात्र विदर्भात सातत्यपूर्ण पाऊस, मेघगर्जना, वारे यामुळे सरासरी कमाल तापमानापेक्षा सध्याचे कमाल तापमान उतरलेले आहे. विदर्भात कमाल तापमानाचा पारा हा २६ ते ३० अंशांदरम्यान आहे. हे तापमान सरासरी कमाल तापमानापेक्षा १२ ते १७ अंशांनी कमी आहे. गोंदिया येथे सरासरीपेक्षा कमाल तापमान १६.९ अंशांनी कमी असून तिथे २५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाचा पारा नोंदला गेला आहे. सध्या किमान तापमानाचा पाराही विदर्भात उतरला आहे. अमरावती येथे रविवारी सकाळी ८.३० पर्यंत तब्बल ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भात सर्वच केंद्रांवर रविवारी सकाळी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात नांदेड येथे रविवारी सकाळी १८.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परभणी येथे १२.६ मिलीमीटर पाऊस सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदला गेला.धुळेकरांना काश्मीरमध्ये असल्याचा भास; लिंबाएवढ्या गारांचा पाऊस, रस्ते झाले बर्फाच्छादित