• Sat. Sep 21st, 2024

बारसूमध्ये आंदोलक महिला हाताला चावल्या, सहा महिला पोलीस कर्मचारी जखमी, पोलिसांचा मोठा दावा

बारसूमध्ये आंदोलक महिला हाताला चावल्या, सहा महिला पोलीस कर्मचारी जखमी, पोलिसांचा मोठा दावा

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथे झालेल्या रिफायनरीविरोधी आंदोलनात महिला आंदोलकांनी महिला पोलिसांच्या हातातील लाठ्या हिसकावून घेतल्या. एवढचं नव्हे तर त्यांच्या हाताला चावे घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आंदोलनकर्त्यांच्या अंगावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पोस्टर्स लावून या महिला आंदोलनात उतरल्याची माहितीही आता पुढे आली आहे.सहा महिला पोलीस कर्मचारी जखमी

आंदोलनादरम्यान उपविभागिय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांच्यासह सहा महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. इतेकच नाही तर आंदोलकांनी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर केला. काही ठिकाणी त्यांनी गवतालाही आग लावून दिली. सुदैव त्यात कोणी आंदोलक अथवा पोलीस कर्मचारी जखमी झाला नाही. आंदोलनावेळी फक्त एका बाजूचे व्हिडिओ समोर आणले जात होते. मात्र आता पोलिसांनी केलेल्या दाव्यातून आंदोलनातील धक्कादायक वास्तव आणि आंदोलकांचा आक्रमकपणा समोर आला आहे.

बारसू येथे शुक्रवारी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार केला आणि आंदोलकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले, अशी माहिती दिली गेली. त्यावर मोठे राजकारणही केले गेले. मात्र, आंदोलकांनी पोलिसांसोबत केलेलं वर्तन अत्यंत धक्कादायक होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.

बारसूतील आंदोलन ३ दिवसांसाठी स्थगित; आजचा दिवस ठरणार निर्णायक, कारण…
आंदोलन होऊ शकते, याची दखल घेऊन पोलिसांनी यावेळी अतिशय मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात ठेवला होता. मात्र आंदोलकांनी पोलिसांच्या या बंदोबस्ताला उत्तर देण्यासाठी नियोजन केले असल्याची माहिती पुढे आली आहे. आंदोलनात सर्व ग्रामस्थ एकाचवेळी उतरले नाहीत. एक एक फळी आंदोलनात येत होती. त्यामुळे पोलिसांना एकाचवेळी कारवाई करता येत नव्हती.

ज्यावेळी महिला आंदोलक प्रतिबंधित क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करत होत्या, तेव्हा महिला पोलिसांनी आपल्या हातातील लाठ्या आडव्या धरुन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी महिला पोलिसांच्या हातातील लाठ्या घेण्यापासून ते महिला पोलिसांच्या हाताला चावे घेतल्याचा दावा पोलिसांनी केला.

नाणार आणि जैतापूर येथे झालेल्या आंदोलनात वापरण्यात आलेल्या पद्धतीचा यावेळी पोलीसांनी विशेष अभ्यास केला होता. त्यामुळे यावेळी महिला पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणात मागवण्यात आली होती. ज्याप्रमाणे आंदोलकांनी त्यांच्या एक एक फळ्या पुढे आणल्या त्यानुसार पोलिसांनीही आपली कुमक तयार ठेवली होती.

Barsu Refinery : पोलिसांनी गाडीत कोंबलं, आंदोलकांचा पिंजऱ्यातून एल्गार, जीव मारा पण मागे हटणार नाही!
आंदोलकांनी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर केला. काही ठिकाणी त्यांनी गवतालाही आग लावून दिली. सुदैव त्यात कोणी आंदोलक अथवा पोलीस कर्मचारी जखमी झाला नाही. अन्यथा आंदोलनाला आणखी वेगळे वळण लागले असते. हे सगळे धक्कादायक वास्तव व असभ्य वर्तनाचे पोलिसांच्या कॅमेरामध्ये चित्रित झाले आहेत. मात्र परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिसांनीच ते समोर आणलेले नाहीत, असे समजते.

अंगावर राष्ट्रपुरुषांची पोस्टर्स कशासाठी

अनेक महिला आंदोलकांच्या अंगावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पोस्टर्स होती. अशा आंदोलकांबाबत पोलिसांकडून काही अनुचित प्रकार घडला असता तर या आंदोलनाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होता का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. आंदोलनाला वेगळे वळण लावण्याचा हा प्रयत्न ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांच्या मनात नेमका कोणी भरवून दिला? याची माहिती आता पोलिसांकडून घेतली जात आहे.

घरोघरी जाऊन साधणार संवाद : कुलकर्णी

बारसू परिसरातील प्रत्येक गावात जाऊन पोलीस दलामार्फत त्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. यासाठी आपण स्वत: ही गावागावात जाणार आहोत. आक्रमक आंदोलन करुन त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यापेक्षा चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. येथील जनता गरीब आहे. त्यांना समजावून सांगणे आमचे काम आहे. ते आम्ही करू. त्यामध्ये आम्हाला यश येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed