• Mon. Nov 25th, 2024
    माझ्या सासुरवाडीचं फार प्रेम उतू चाललंय, पण…; अजित पवारांनी ‘बॅनर बहाद्दरांना’ फटकारलं

    मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या काही दिवसांत येणे अपेक्षित आहे. शिंदेंना साथ दिलेले १६ आमदार निलंबित होऊन राज्यातलं सरकार कोसळेल, असा दावा वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातोय. अशा स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची ‘सेफ’ नसून त्यांच्याजागी नवा मुख्यमंत्री होईल, अशा चर्चा संपूर्ण राज्यात जोरात सुरु आहेत. अशा वातावरणात विरोधी पक्षनते अजित पवार मुख्यमंत्रिपदासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करत असल्याचंही अधून मधून वृत्त येतं. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लावले जातायेत. राष्ट्रवादीच्या अशाच ‘वाढीव कार्यकर्त्यांना’ अजित पवार यांनी ‘कायद्याची गोष्ट’ सांगितली.

    माझ्या सासुरवाडीचं फार प्रेम उतू चाललंय

    माझ्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लावण्यात येऊ नयेत. आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चुकीची अपेक्षा मनात ठेऊन असे बॅनर लावलेत. पण मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ ची मॅजिक फिगर संबंधित नेत्याकडे असावी लागते. त्याचवेळी तो नेता मुख्यमंत्री होतो. माझ्या माझ्या सासुरवाडीचं फार प्रेम उतू चाललंय, पण सध्या आमच्याकडे मॅजिक फिगर नाहीये, असं मिश्किल अंदाजात सांगताना अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शाळा घेतली.

    बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही, ते लावू नका

    बॅनर लावून कुणी मुख्यमंत्री होत नसतं. ज्याला मुख्यमंत्री व्हायचंय त्याच्याकडे बहुमताचा आकडाच लागतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असं कुणालाच वाटलं नव्हतं, पण त्यांनी विविध क्लुत्या, आयडिया वापरुन भाजपच्या साथीने खुर्ची मिळवली. ते मुख्यमंत्री होतील, असं कुणालाच वाटलं नव्हतं, पण बहुमताचा आकडा असल्याने ते मुख्यमंत्री झाले. माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मी विशेष आवाहन करतो, की अशा प्रकारचे बॅनर लावू नयेत, असं अजितदादा म्हणाले.

    जास्तीत जास्त आमदार निवडून आणा, तेव्हा अशी पदं मिळतात

    सहकारी, कार्यकर्ते, हिंतचिंतक आणि सासुरवाडीच्या लोकांचा बॅनरच्या माध्यमातून चुकीचा आग्रह आहे. तुम्ही जास्तीत जास्त काम करा. आपल्या विचारांचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणा. तेव्हा अशी पदं मिळतात त्यालाही वरिष्ठांचा आशीर्वाद हवा, असंही अजित पवारांनी हसत हसत सांगितलं.

    यावेळी खासदार अमोल कोल्हे यांच्या मताप्रमाणे जयंत पाटील यांच्यासारखा स्वच्छ माणूस मुख्यमंत्रिपदी बसला पाहिजे या मतावरही अजितदादांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले- आमच्या खासदारसाहेबांना जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावेसे वाटतात. लोकशाहीत अशी मतं व्यक्त करण्याचा सगळ्यांना अधिकार असतो. माझ्या शुभेच्छा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *