• Mon. Nov 25th, 2024

    देवेंद्रजी कोणासोबत आहेत हे तरी कुठे कळतंय? अमृतावहिनींच्या प्रश्नाचा राज ठाकरेंनी निकाल लावला

    देवेंद्रजी कोणासोबत आहेत हे तरी कुठे कळतंय? अमृतावहिनींच्या प्रश्नाचा राज ठाकरेंनी निकाल लावला

    मुंबई:गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि अजित पवार यांच्यात पडद्यामागे राजकीय वाटाघाटी सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. या सगळ्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत भाष्य केले आहे. ते बुधवारी मुंबईत लोकमत वृत्तसमूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना काही खोचक प्रश्न विचारले. सध्याच्या राजकारणात एकमेकांना टाळ्या देण्याचं आणि डोळे मारण्याचे प्रमाण वाढले आहे. तुम्हीदेखील कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ दिसता, कधी बाळासाहेबांच्या शिवसेनेजवळ दिसता, तर कधी भाजपला टाळी देता. मग तुम्ही नक्की कोणासोबत आहात, असा बोचरा प्रश्न अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना विचारला.

    अमृता फडणवीस यांच्या या प्रश्नावर राज ठाकरे यांनी थोडाही वेळ न दवडता त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. अमृता फडणवीस यांनी या मुलाखतीपूर्वी, ‘मी भाजपची प्रतिनिधी किंवा देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणून या मुलाखतीत प्रश्न विचारणार नाही’ असा डिस्क्लेमर दिला होता. हाच धागा पकडत राज ठाकरे यांनी म्हटले की, आता तुम्ही देवेंद्रजींच्या पत्नी म्हणून इथे बोलत नाही आहातच म्हणून काही गोष्टी बोलूनच टाकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही सध्या कोणासोबत आहेत हेच कळत नाही. त्यावर अमृता फडणवीस यांनी ‘देवेंद्रजी खूप लॉयल आहेत’, असे म्हणत प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. त्यावर राज ठाकरे यांनी तितक्याच हजरजबाबीपणे उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस पहाटे गाडी घेऊन कुठे जातात, याचा पत्ता कित्येकदा तुम्हालाही नसतो. कधीतरी ते शिंदेंसोबत असतात, कधी अजित पवारांचा चेहरा पहाटे उतरलेला असतो. अशा अनेक गोष्टी घडताना दिसतात. हल्ली राजकीय नेते एकमेकांना भेटले तर त्याची बातमी होते. त्यामुळे राजकारणातील मोकळेपणा गेला आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

    या मुलाखतीपूर्वी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘राज ठाकरे…. नावातच राज आहे, तुम्हाला पाहताच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिबिंब समोर येतं. तसंच व्यक्तिमत्त्व, तोच बाणेदारपणाचा लूक, जो तुम्ही देताय, तोच करिष्मा, तोच दबदबा, बोलण्याची तीच लय, बाळासाहेबांचे तुम्ही लहानपणापासून फेवरेट, ते प्रेमाने तुम्हाला टिनू म्हणायचे.. शिवसेनेची धुरा आज तुमच्या हाती असती, तर आज ही अवस्था झाली नसती… राज्य हातात असताना शिवसैनिक पळून जाणं, एवढे नेते दुरावणं कधी झालं नसतं, शिवसेनेच्या तत्त्वांशी तडजोड झाली नसती’, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed