• Mon. Nov 25th, 2024
    कांदा झाकायला गेला ‘तो’ पुन्हा आलाच नाही, वीज काळ बनून कोसळली…

    परभणी: परभणी जिल्ह्यामध्ये वादळ वारे आणि गारपिटीचा कहर सुरू असून सोनपेठ पाठोपाठ मानवत परिसरात देखील तुफान गारपिट झाली आहे. सुमारे एक तास सुरू असलेल्या या गारपिटी दरम्यान मोठमोठ्या गारांचा खच पडलाय. त्यामुळे शेतातील उरल्या-सुरल्या पिकांचं नुकसान झालं आहे. दुसरीकडे पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे शेतामध्ये काम करत असताना एका ३२ वर्षीय युवकाच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. अगोदरच शेतकरी संकटात असताना पुन्हा जिल्ह्यावर गारपिटीचं संकट आलंय.वीज अंगावर कोसळून युवकाचा मृत्यू

    परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतात ठेवलेले कांदे झाकत असताना विठ्ठल कोकरे या ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. युवकाचा मृतदेह रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. शेतामध्ये कांदे झाकत असताना विठ्ठलाचा मृत्यू झाल्याने कोकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    मागील आठ ते दहा दिवसांपासून परभणीमध्ये अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावत आहे. अशातच काल परभणीच्या पूर्णा तालुक्यात गारपीट झाली होती. त्यामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले होते. असे असतानाच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज मानवत तालुक्यातील पार्डी,सोमठाणा, नरळद, निलवर्ण टाकळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळी गारपीट झाली. त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *