राज्यात अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असताना मुख्यमंत्री शिंदे २४ ते २६ एप्रिल दरम्यान तीन दिवस सुट्टी घेऊन कुटुंबासह साताऱ्यात त्यांच्या दरे या गावी गेल्याची माहिती आहे. गावाच्या जत्रेसाठी हा पूर्वनियोजीत दौरा असल्याचा दावा त्यांच्या कार्यालयाने केलाय. पण गावी जाण्यामागे इतरही काही कारणं असल्याचं बोललं जातंय. यातलं पहिलं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर निकाल. या निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. जर हा निकाल शिंदेंच्या बाजूने लागला तर राज्यात असलेले सरकार कायम असेल. जर निकाल त्यांच्या विरोधात लागला तर शिंदे गटासाठी तो मोठा धक्का ठरेल. निकाल आपल्याच बाजूने लागावा यासाठी शिंदे देवाला साकडं घालण्यासाठी गेल्याच्या चर्चा आहे.
तर दुसरं कारण म्हणजे राज्यातील सरकार कायम राहावं यासाठी भाजप प्लॅन बी करत आहे. त्यामध्ये अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चा आहे. भाजपने अजित पवारांना सोबत घेण्याची चर्चा कदाचित शिंदे यांना पटली नसावी. त्यामुळे ते काही दिवस सुट्टीवर गेल्याचा अंदाज अनेकांनी वर्तविला आहे.
तिसरं कारण म्हणजे खारघर दुर्घटनेत १४ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. शक्तीप्रदर्शनाच्या प्रयत्नात श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याच्या आरोप विरोधकांनी केला. प्रकरण हायकोर्टात गेल्यानेही मुख्यमंत्री चिंतेत असल्याचे सांगितले जाते. एकीकडे राज्यात उलट सुलट चर्चा सुरु असताना भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते कर्नाटकात आहेत. तेथील निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे कर्नाटकमध्ये गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत चालला होता. याच दबावातून देखील ते रजेवर असल्याची चर्चा होत असून विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.