ठाणे (अंबरनाथ): मद्यपी वडिलांकडून आईला रोज मारहाण होत असल्याच्या रागातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी अंबरनाथ पश्चिमेकडील बुवापाडा परिसरात घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी मुलाला अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
बुवापाडा परिसरात राजेश वर्मा हा त्याची पत्नी अनिता आणि १९ वर्षांचा मुलगा प्रकाश याच्यासह वास्तव्याला होता. मात्र, राजेशला दारूचे व्यसन होते आणि त्यातूनच पती-पत्नींमध्ये सतत वाद होऊन राजेश हा अनिताला नियमित मारहाण करत होता. याचा प्रकाशला संताप येत असे. त्यावरून प्रकाश आणि राजेश या बाप-लेकांमध्ये वाद होत होते. रविवारी संध्याकाळीही राजेश दारू पिऊन घरी आला.

त्यानंतर पती-पत्नीत झालेल्या वादावादीत राजेश याने पत्नी अनिताला मारहाण करत असताना यावेळी मुलगा प्रकाश याने वडिलांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही राजेश हा पत्नीला प्रकाशसमोर मारहाण करतच राहिला. अखेर संतप्त झालेल्या प्रकाशने घरातील चाकू राजेश याच्या छातीत खुपसला. या हल्ल्यात राजेश याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राजेश वर्मा याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तर, पत्नी अनिता हिच्या फिर्यादीवरून मुलगा प्रकाश याच्याविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.