सांगली दि. २५ (जिमाका) : तासगाव नगरपरिषदेने स्वच्छतेच्या कामात उत्कृष्ट काम केले असून त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी तासगाव येथे काढले.
तासगाव नगरपरिषदेच्या वतीने दत्त मंदिरासमोरील नगरपरिषदेच्या जागेमध्ये सुशोभीकरण, हरित पट्टे विकास व उद्यान विकसित करणे, फूड पार्क या कामांचे भूमिपूजन व पायाभरणी समारंभ केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील, तहसीलदार रवींद्र रांजणे, गट विकास अधिकारी श्री. मोहिते, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. कराड म्हणाले की, तासगाव शहराचा कल्पकतेने विकास होत असून यामध्ये स्वच्छतेच्या कामाचा मोठा वाटा आहे. पाणीपुरवठा ड्रेनेज व शहराची अंतर्गत स्वच्छता यामुळे नगरपरिषदेने राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. तासगाव नगरपरिषदेने केंद्र व राज्य सरकारच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवून सामान्य माणसाला त्याचा लाभ मिळवून देण्यात पुढाकार घेतला, ही देखील गौरवाची बाब आहे.
केंद्र सरकारने महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण करण्यास प्राधान्य दिले आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांच्या मालाचे मार्केटिंग करता यावे, यासाठी नाबार्डच्या माध्यमातून बचत गटांना मदत करू, अशी ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. कराड यांनी यावेळी दिली.
खासदार संजय पाटील यांनी सांगितले की, २ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे तासगाव शहराच्या वैभवात भर पडणार आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून तासगाव शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे राबविली जात आहेत. द्राक्ष व बेदाणा यासाठी या परिसरात मोठी बाजारपेठ असून तासगाव व तालुक्याच्या विकास कामांना निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही खासदार संजय पाटील यांनी दिली.
कार्यक्रमात तहसीलदार रवींद्र रांजणे, माजी नगरसेवक किशोर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केले. नगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेली विविध विकास कामे व उपक्रमाची माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली.
०००