• Sat. Sep 21st, 2024
कोणी आईला फ्लॅट दाखवायला, कोणी आजोळी जाताना माय गमावली; पुण्यात पहाटे भीषण अपघात

कोल्हापूर: आज रविवारी पहाटेच्या सुमारास पुणे – बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर नऱ्हे आंबेगाव नजीक खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तब्बल १८ जण जखमी झाले. मृत्यू झालेल्या ४ जणांपैकी दोघे जण राधानगरी तालुक्यातील आई मुलगा असून रवींद्र वासुदेव कोरगांवकर (वय ४७) आणि श्रीमती सुवर्णा वासुदेव कोरगांवकर (वय ८५) अशी मृत्यू झालेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. तर कोल्हापूर शहरातील निशा प्रमोद भास्कर (वय ३६)) राहणार शास्त्रीनगर असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

मिळालेली माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या निशा प्रमोद भास्कर या आपल्या ६ वर्षीय चिमुकली अधिरा प्रमोद भास्कर हिच्यासह मुंबई-कल्याण येथे आपल्या माहेरी निघालेल्या होत्या. दरम्यान, पुण्याला गाडी पोहोचण्याआधीच काळाने घाला घातला आणि झालेल्या अपघातात निशा प्रमोद भास्कर यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी अधिरा ही जखमी झाली असून निशा भास्कर यांचा मृतदेह सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरात आणण्यात येत आहे.

जगतापांचे बॅनर लागले, आता पवारांच्या मर्जीतल्या नेत्यानं पुणे लोकसभेसाठी शड्डू ठोकला, राजकीय वातावरण तापलं
रवींद्र कोरगांवकर हे पोस्ट खात्यात नोकरीला असून त्यांची सिंधुदुर्गहून मुंबईला गेल्यावर्षी बदली झाली होती. त्यामुळे ते आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह मुंबईत राहत होते. तर रवींद्र यांनी काही दिवसांपुर्वी मुंबईत नवीन फ्लॅट देखील घेतला होता. फ्लॅट आपल्या आईला दाखवण्यासाठी ते आईसोबत दाजीपुर ते कोल्हापूर आणि तेथून खासगी बसने शनिवारी रात्री मुंबईला जात होते.

दरम्यान, रविवारी पहाटे साधारण दोनच्या सुमारास पुणे – बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर नऱ्हे आंबेगाव नजीक बसला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली आणि स्लिपर कोच बसमध्ये मागच्या बाजूस झोपलेल्या कोरगांवकर माय लेकरांचा झोपेतच दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताचे बातमी समजताच रवींद्र यांचे चुलत बंधू सदानंद कोरगांवकर हे नातेवाईकांसह पुण्याला रवाना झाले. रवींद्र यांचे वडील वासुदेव कोरगांवकर हे दाजीपूरचे माजी सरपंच होते. त्यांचही सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. दरम्यान, दोघांचे मृतदेहांवर आज रविवारी रात्री दाजीपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रनमशिन फॅफ ड्यु प्लेसिसच्या टॅटूचा अर्थ आहे खरंच सुंदर, जाणून घ्याल तर म्हणाल क्या बात हैं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed