म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईःवांद्रे वरळी सागरी सेतूवर दुचाकींना प्रवेश बंदी असतानाही सी-लिंकवर रात्री ते पहाटेच्या दरम्यान दुचाकी शर्यत लावणाऱ्या २० चालकांच्या वांद्रे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आले असून सर्वांवर मोटारवाहन आणि भादंवि कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली.पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, कार्टर रोड, बॅण्डस्टॅण्ड या परिसरात मध्यरात्रीनंतर दुचाकीस्वार सुसाट असतात. या परिसरात दुचाकींच्या शर्यती लावून त्यावर जुगारही खेळला जातो. हे प्रकार वारंवार घडत असल्याने पोलिसांच्या वतीने अशा चालकांना पकडण्यासाठी अनेकदा विशेष मोहीम हाती घेतली जाते. गेल्या आठवड्यात पोलिसांनी अनेक चालकांवर कारवाई केली असताना बंदी असतानाही वांद्रे वरळी सागरी सेतूवरही शर्यत लावली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे वांद्रे पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री उशिरा या भागात नाकाबंदी लावली.
या नाकाबंदीत २० दुचाकीचालकांना तसेच त्यांच्या मागे बसलेल्या सहप्रवाशाला पकडण्यात आले. त्यांच्यावर वांद्रे पोलिस ठाण्यात मोटार वाहन अधिनियम तसेच भादंवि २७९, ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पकडण्यात आलेले सर्वजण कुर्ला, चेंबूर, वडाळा, पनवेल परिसरातील असून त्यांनी खास शर्यतीसाठी दुचाकींमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे. दुचाकीमधील फेरफार केल्याबद्दल पोलिसांनी परिवहन विभागालाही कळविले आहे.स्वमग्नतेबाबत जागरुकतेसाठी जियाने पोहत कापलं ३६ किमीचं अंतर