मिळालेल्या माहितीनुसार, राकेश दिनेश धोंडगे (वय २३) असं मृत्यू झालेल्या युवा शेतकऱ्याचं नाव असून २० एप्रिलला दुपारी घडली. दिनेश धोंडगे यांचा मुलगा राकेश हा घरून ट्रॅक्टरवर शेतात रोटावेटर मारण्यासाठी जात होता. खामखेडा गावातील शेवाळे वस्तीजवळ जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये ट्रॅक्टर उलटला. या ट्रॅक्टरखाली राकेश दाबला गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यावेळी आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत राकेशला बाहेर काढलं. तसेच त्याला तात्काळ देवळा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत राकेशचा मृत्यू झाला होता. कुटुंबियांना राकेशच्या निधनाच्या बातमी कळताच धोंडगे कुटुंबाने धावत रुग्णालयात धाव घेतली. मात्र, राकेशच्या जाण्याची बातमी कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे.
मुळचे निमगोले येथील असलेले धोंडगे कुटुंब पिळकोस शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. महिन्याभरापूर्वी राकेशचा विवाह झाला होता. त्याच्या कुटुंबियांनी मोठ्या थाटात त्याचे लग्न लावून दिले होते. नुकतीच वैवाहिक जीवनाला सुरुवात केली होती. त्यातच अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हिंदू बांधवांचा अक्षय तृतीया आणि महिनाभराचा कठोर उपवास करून झाल्यानंतर मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंतु जिल्ह्यात काही अघटीत घटना घडल्या.