• Sat. Sep 21st, 2024
गोंधळ, चेंगराचेंगरी, आक्रोश; जितेंद्र आव्हाडांकडून चेंगराचेंगरीचा खळबळजनक व्हिडिओ शेअर

नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. चेंगराचेंगरीचा हा व्हिडिओ नक्की कुठला आहे, हे आव्हाड यांनी स्पष्ट केलेले नाही. समाज माध्यमांमधून हा व्हिडिओ आला आहे. हा व्हिडिओ मॉर्फ नाही कारण, महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते हा चेंगराचेंगरीचा प्रकार कुठे घडला असावा?, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल्याप्रमाणे, या व्हिडिओत लोकांची चेंगराचेंगरी सुरु असल्याचे दिसत आहे.

प्रचंड गर्दी असल्यामुळे लोकांना पुढे जायला रस्ता मिळत नाही. अनेकजण या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. चेंगराचेंगरीमुळे खाली पडलेल्या काही महिला या जमिनीवर निपचित पडलेल्या दिसत आहेत. हा सर्व गोंधळ सुरु असताना एका रुग्णवाहिकेचा सायरन सतत वाजत आहे. महाराष्ट्र शासन असे लिहलेल्या प्रचंड गर्दीमुळे या रुग्णवाहिकेला पुढे जायला जागा मिळत नाही. रुग्णवाहिका थोडी पुढे जाताच काही महिला खाली पडल्याचे दिसत आहे. याठिकाणी भीषण चेंगचेंगरी सुरु असून एक व्यक्ती जमिनीवर पडलेल्या महिलेला सीपीआर देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहता घटनास्थळावरील परिस्थिती भीषण असल्याचे दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कोणत्या कार्यक्रमातील आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. यावरुन सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. आता प्रशासन आणि अन्य यंत्रणा हा व्हिडिओ नेमका कुठल्या कार्यक्रमातील आहे, याची खातरजमा करुन पुढील पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडलेल्या दुर्घटनेविषयीही एक ट्विट केले होते. खारघर येथील दुर्घटनेत उष्माघातामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या १४ अनुयायांचा मृत्यू झाला होता. हे सर्वजण आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतानाचा क्षण पाहण्यासाठी याठिकाणी आले होते. परंतु, हा कार्यक्रम संपल्यानंतर पाणी पिण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली. या गर्दीत घुसमटून अनेकजण बेशुद्ध पडले होते, काहींना उष्माघातामुळे भोवळ आली होती. या दुर्घटनेविषयी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमधून अनेक सवाल उपस्थित केले होते. खारघर दुर्घटनेत खरंच किती जण मृत्युमुखी पडले? श्री सेवकांचे मृत्यू उष्मघाताने की चेंगराचेंगरीत झाले? आयोजक सरकार होते. लपवालपवी करू नका. जबाबदारीचा स्वीकार करा. खारघर दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या आणि जनतेला दाखवा. उच्च न्यायालयाने चौकशी आयोग नेमून या दुर्घटनेची चौकशी करावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed